महुद: गावातील अवैधरीत्या दारू विक्री, जुगार, मटका बंद करावेत म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केल्याचा राग मनात धरून गावातील अवैध व्यावसायिकांनी चक्क पोलिसांसमोर सरपंचांना हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी वाकी (ता. सांगोला) ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल शिवाजी हंबीरराव यांनी अजित बुचडे, नीलेश होवाळ, सुनील चव्हाण, सागर हेगडे व सुंदर काटे यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला आहे.
सांगोला तालुक्यातील वाकी- शिवणे गावात खुलेआम अवैधरीत्या दारू विक्री तसेच जुगार, मटका व गुटखा व्यवसाय तेजीत चालू आहे. अवैध व्यवसायामुळे गावातील नागरिक, महिला, शाळकरी मुलांना त्रास होत आहे.
याबाबत ग्रामपंचायतच्या सभेत हे व्यवसाय बंद करावेत म्हणून ग्रामसभेत महिला, ज्येष्ठ नागरिकांनी एकमताने ठराव मंजूर केला होता. ग्रामसभेच्या ठरावाची दखल घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांनी दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेले असता चक्क पोलिसांसमोर सरपंच अनिल हंबीरराव यांना हातपाय तोडून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला
याबाबत सरपंच अनिल हंबीरराव यांनी पोलिस अधीक्षक सोलापूर, दारूबंदी अधिकारी सोलापूर, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा व पोलिस निरीक्षक सांगोला यांना ग्रामसभेच्या ठरावाची नक्कल जोडून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.


