अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे इथं एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला आहे.
संबंधित महिला दुचाकीने अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात होत्या. देवीच्या दर्शनाला पोहचण्याआधीच दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे.
पल्लवी नवलकर असं मृत पावलेल्या 25 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. त्या अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी त्या दुचाकीने दहिगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. भरधाव वेगानं दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत अनर्थ घडला. त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून त्या रस्त्यावर पडल्या.
दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पल्लवी यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे. 25 वर्षांच्या विवाहित महिलेचा अशाप्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने दहिगाव गावंडे गावात शोककळा पसरली आहे.


