👁 4 Views

लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यावरून चाकू हल्ला, आतेभावांची जुंपली ; पोलिसांत गुन्हा दाखल

लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यावरून चाकू हल्ला, आतेभावांची जुंपली ; पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर: लाडक्या बहिणीचे बँकेत जमा झालेले पैसे काढण्यावरून आतेभावांमध्ये वाद झाला. मोबाईल लिंकचा मेसेज लवकर सांगितला नसल्याने हा वाद वाढत गेला. यावेळी सोहेल जहाँगीर नदाफ (रा. रेणुकानगर, यड्राव इचलकरंजी, ता.हातकणंगले) याने केलेल्या चाकू हल्ल्यात तौहिद फिरोज पिंजारी (वय २० रा. यड्राव) हा जखमी झाला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी तौहिद पिंजारी व सोहेल नदाफ हे नात्याने आतेभाऊ आहेत. तौहिद याच्या आईचे लाडक्या बहिणीचे पैसे बँकेतून काढावयाचे होते; मात्र बँक खात्यासाठी सोहेल नदाफ याचा मोबाईल नंबर दिल्याने त्यालाच सर्व मेसेज जातात. १ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता तौहिद व त्याची आई सोहेल यास फोन करून लिंक पाठवण्यास सांगत होते; मात्र संशयित सोहेल फोन उचलत नव्हता.

आपल्या आईचे बँकेतील पैसे काढण्यासाठी सोहेलचा नंबर लिंक आहे; मात्र तो लवकर फोन उचलत नाही. त्यामुळे तौहिद रागाने सोहेल यास बोलला, त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन शाब्दिक चकमक घडली. सोहेल नदाफ हा तोहिद पिंजारी याच्या घरासमोर आला. मोठ्याने हाका मारू लागला. ‘बाहेर ये, तुला बघून घेतो’, असे ओरडू लागला. तेव्हा तौहिद बाहेर आल्यानंतर सोहेलने खिशातून चाकू काढून तौहिदच्या पोटात वार केला. जखमी होऊन तो खाली कोसळला. यावेळी नातेवाईकांनी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर जखमी तौहिद पिंजारी याने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार धुमाळ तपास करत आहेत. बँक खात्यास मोबाईल नंबर दुसऱ्याचा वापरल्यामुळे हा वाद झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *