पंढरपूर: लग्नासाठी थाटलेला मांडव…. खास नवरा-नवरीसाठी सजवलेला भोवला आणि सजलेल्या लग्न मंडपातील सनई चौघड्याचे मंगल स्वर… अशा प्रसन्न आणि उत्साही वातावरणामध्ये रविवारी (ता. २) दुपारी १२ वाजता राज सुकुमार मदनाचा पुतळा अशा साक्षात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
देवाच्या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपुरात आले होते. भाविकांच्या गर्दीने मंदिर व परिसर अक्षरशः तुडुंब भरून गेला होता.
वसंत पंचमी या दिवशी साक्षात भगवंताचा रुक्मिणीबरोबर विवाह झाल्याची आख्यायिका रुक्मिणी स्वयंवर या कथेत आहे. या कथेनुसार आज साक्षात श्री विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा विठ्ठल मंदिरतील सभा मंडपात मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला. दरम्यान, आज विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
आज दुपारी देवाची पाद्य पूजा झाली. त्यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते देवाला गुलाल लावण्यात आला. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची उत्सवमूर्ती लग्न मंडपात आणली. दुपारी १२ वाजता देव ब्राह्मणांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला.


