डोंबिवली एमआयडीसी परिसरात झाड उन्मळून पडले. रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर हे झाड पडल्याने या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. रामदिन लोधी (वय 60) असे रिक्षा चालकाचे नाव असून गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे.
एमआयडीसी निवासी भागात मोठ्या प्रमाणात झाडे असून त्यांची वेळेत छाटणी व देखभाल केली जात नाही. येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामुळे झाडांच्या मुळाला धोका निर्माण झाला आहे यामुळे या घटना होत असल्याचे बोलले जात आहे.
डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात ममता हॉस्पिटलसमोर ही दुर्घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेले झाड अचानक रस्त्यावर कोसळले. दोन रिक्षांवर हे झाड पडले. यात कोळेगाव येथे राहणाऱ्या रामदिन यांच्या रिक्षावर देखील हे झाडं पडले. यात रिक्षा पूर्णपणे चिरडली गेली व रामदिन हे गंभीर जखमी झाले.
रस्त्यावरील व हॉस्पिटलमधील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन रामदिन यांना बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत रिक्षासह रस्त्यावर उभ्या केलेल्या काही दुचाकींचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांचे नुकतेच सिमेंट काँक्रीटीकरणचे काम करण्यात आले आहे. यावेळी अनेक झाडांना धक्का बसला आहे. कुठे झाडांची मुळे उघडी पडली आहेत तर कोठे खोडांपर्यत, झाडांची अर्धी मुळे तोडून बांधकाम करण्यात आले आहे.
केवळ एमआयडीसी निवासी भाग नाही तर शहरात देखील अनेक ठिकाणी रस्त्यांचे, गटाराचे बांधकाम सुरू असताना झाड उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.


