पांगरी: भूम तालुक्यातील सुटका गावाच्या परिसरातील तलावाजवळील रस्त्यावर मध्यरात्री वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरात वाघाच्या पावलांचे ठसे आणि त्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत.
उक्कडगाव (ता. बार्शी) परिसरात शनिवारी (ता. १७) तीन जनावरांवर हल्ला करून वाघ सोलापूर जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथवाडी, वडजी, सुटका असा प्रवास करत परतीच्या वाटेला लागला की काय, की तो आपली हद्द वाढवीत तर चालला नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.
वडजी (ता. भूम) येथे वासरावर हल्ला केल्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर गुरुवारी (ता. २३) रात्री एक वाजता सुटका परिसरातील तलावाजवळ एका नागरिकाने वाघ रस्त्यावरून जाताना पाहिला. काही वेळ वाघोबा रस्त्यावर थांबल्यानंतर तो तलावाच्या दिशेने निघून गेला. तो वाघ तलाव परिसरात वावरत होता आणि त्याच्या हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. तलावाजवळ आणि शेजारील शेतांमध्ये वाघाचे ठसे सापडले. या ठशांच्या आधारे वाघ असल्याची खात्री वन विभागाने केली आहे. काही दिवसांपासून वाघाला पकडण्यासाठी शासनाने विशेष रेस्क्यू टीम तैनात केली आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी सापळे, ड्रोन आणि अन्य तांत्रिक उपकरणांचा वापर केला जात आहे.
वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष रेस्क्यू टीम काम करत आहे. परंतु अद्याप पकडण्यात यश आलेले नाही. कालच्या घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे. नागरिकांनी संयम ठेवावा, सुरक्षेची काळजी घ्यावी.


