चाकण – येथील माणिक चौकात कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली होती. यातील मुलीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
धनश्री अंबादास गाढवे (वय नऊ) असे मृत मुलीचे नाव आहे.
चाकण (ता. खेड) येथील माणिक चौकात चाकण-शिक्रापूर मार्गावर माणिक चौकात हा अपघात गुरुवारी (ता. १६) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला होता. त्यानंतर या कंटेनरचालकाने चाकण ते शिक्रापूर दरम्यान धुडगूस घालत अनेक वाहनांना धडक दिली होती.
त्या अपघातात दोन महिला व एक मुलगी जखमी झाली होती. मुलीच्या पायावरून चाक गेल्याने मुलीच्या पायाला मोठी गंभीर दुखापत झाली होती. या मुलीची आई गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या मुलीच्या आईच्या पायावरूनही चाक गेले आहे. त्यामुळे तिच्या पायालाही मोठी दुखापत झाली आहे.
या मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. त्यामुळे तिच्या उपचारावर खर्च कसा करायचा, हा प्रश्न तिच्या वडिलांना पडला होता. आई व मुलगी दोघींवर उपचार सुरू होते. त्यात मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.


