👁 3 Views

वाल्मीकची ज्योती जाधवच्या नावे सोलापुरातही संपत्ती

वाल्मीकची ज्योती जाधवच्या नावे सोलापुरातही संपत्ती

सोलापूर: केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे पुण्यापाठोपाठ सोलापुरातही शेतजमीन असल्याची माहिती समोर आली आहे.

खंडणीसारख्या प्रकरणांतूनच कराडने संपत्ती गोळा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्योती मंगल जाधव हिच्या नावे सोलापुरात चार शेतजमिनी असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल एक्सवर पोस्ट केली आहे.

दमानिया यांनी चारही शेतजमिनीची तपशीलवार माहिती देत या सर्वांची चौकशी ईडीने करावी अशी मागणी केली होती. जमिनी कोणी घेतल्या, पैसे कोणी व कसे दिले याचीही चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी दमानियांनी केली आहे. याबद्दलची अधिक चौकशी केली असता, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शेंद्री गावात जाधव यांच्या मालकीच्या चार शेतजमिनी असल्याची माहिती मिळाली. गट क्रमांक 504 मधील उपविभाग 1, 2, 3, 4 अशा एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या मालकीच्या आहेत. या सगळ्या जमिनींचे एकूण क्षेत्रफळ 35 एकरांच्या घरात आहे. बाजारभावानुसार त्याचे मूल्य दीड कोटी रुपयांच्या आसपास होत आहे.

काही दिवसांपूर्वी ज्योती जाधवच्या पुण्यातील संपत्तीची माहिती उघडकीस आली. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजसमोर जाधवच्या मालकीच्या दोन कार्यालयीन वापरासाठीच्या जागा आहेत. याशिवाय हडपसरमधील ऍमनोरा टाऊनशीपमध्ये दोन सदनिका आहेत. याशिवाय खराडीत एक सदनिका आहे. इतकी संपत्ती खरेदी करण्यासाठी ज्योती जाधवकडे पैसा आला कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ज्योती जाधव यांनी पुण्यात जमीन कार्यालयीन वापराच्या जागा, सदनिका खरेदी करताना काही कागदपत्रे सादर केली. तीच कागदपत्रे तिने बार्शीत शेतजमिनी खरेदी करताना दिली. त्यामुळे दोन्ही ज्योती जाधव या एकच असल्याचे उघड झाले आहे. बार्शीत खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे व्यवहार एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीत झालेे आहे. त्यांचे सात-बारा उतारे समोर आलेे आहेत. जाधव यांनी एका कुटुंबाकडून ही जमीन खरेदी केली. या कुटुंबातील सदस्यांकडे आधी जमिनीची मालकी होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *