👁 6 Views

बीडमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा भयंकर मृत्यू

बीडमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा भयंकर मृत्यू

बीड शहरानजीक असणाऱ्या घोडका राजुरी फाटा इथं एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना भरधाव बसने चिरडलं आहे. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर दोन जण जखमी झाले आहेत. दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी धरून, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ओम सुग्रीव घोडके (वय 19 वर्षे) विराट बब्रुवान घोडके (वय 18 वर्षे) आणि सुबोध बाबासाहेब मोरे (वय 19 वर्षे) असं अपघातात मृत पावलेल्या तीन तरुणांची नावं आहेत. हे तिघेही बीड शहरानजीक असलेल्या घोडके राजुरी गावचे रहिवासी होते. याच गावचे रहिवासी असणारे आदित्य लक्ष्मण घोडके आणि निखिल बळीराम डरपे हे दोन तरुण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्यावर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही तरुण मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करतात. ते दररोज व्यायाम करण्यासाठी बीड – परळी राष्ट्रीय महामार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर जातात. रविवारी सकाळी 6 वाजता हे पाचही जण याठिकाणी व्यायामासाठी गेले होते. पण या तरुणांवर काळाने घाला घातला आहे. बस क्रमांक MH 14 BT 1473 या बसने तिघांना चिरडलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्त-मांसाचा सडा पडला.

या अपघातानंतर बस काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली. या अपघातामुळे घोडकाराजुरी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत. हा अपघात नेमका कशामुळे घडला? बस चालक दारुच्या नशेत होता का? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *