Pandharpur Live News:
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार आहे. पुणे विभागातील दहा लोकसभा मतदार संघात दोन टप्पात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे व विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकसभा निवडणूक नि:पक्ष, पारदर्शी आणि आदर्श आचारसंहितेचे संपूर्ण पालन करुन पार पाडण्यासाठी पुणे विभाग सज्ज आहे. त्याची ही थोडक्यात माहिती…
टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मतदारांना सुविधा
दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ च्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रात प्रवेश करताना दिशादर्शक फलक, त्याठिकाणी सुस्थितीतील रॅम्प, व्हील चेअर, विश्रांती कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, प्रथमोचार पेटी, मतदान केंद्र तळमजल्यावर तसेच मतदान केंद्रांवर त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनतळ, मतदान केंद्रामध्ये जाताना रांगेत न थांबवता स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. असे ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक राहील.
मतदारांना आवाहन
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क जरुर बजवावा. नि:पक्ष आणि निर्भयतेने मतदान करण्यासाठी निवडणूक यंत्रणा आपल्या सदैव मदतीला असते. सर्व पात्र मतदारांनी मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवावी, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य करुन आपली लोकशाही अधिक बळकट करण्यास पुढे यावे. आपणही आपले कर्तव्य निभावू….चला मतदान करुया….

