लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यात आल्या आहेत. त्यातच शहर आणि ग्रामीण भागात यंदा दुष्काळाचे सावट असून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणे गरजेचे होतं. यासाठी काही सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पुढाकार घेत पाणीपुरवठा केला जातो. मात्र यावेळी निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अशा प्रकारच्या समाजसेवेला निर्बंध येत होते. मात्र निवडणुकीच्या काळात नागरिकांना पाणी मिळायला हवे ही बाब लक्षात घेत, पाण्यावाचून जनतेची अडचण होऊ नये यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आचारसंहितेमधून मुभा देण्यासाठी पत्र लिहून मागणी केली होती.
प्रणिती शिंदे यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले असून निवडणूक आयोगाने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भारत निवडणूक आयोगाव्दारे देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन, आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेवून आपल्या स्तरावर टंचाईग्रस्त भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या सामाजिक कार्यास आचारसंहितेमधून मुभा देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुका असल्या तरी ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेला केवळ आचारसंहितेमुळे पाण्याची समस्या भेडसावू नये म्हणून केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. प्रणिती शिंदे यांचे प्रयत्न आणि आयोगाने दिलेल्या परवानगीमुळे ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करता येणार आहे. यामुळे नागरी वस्तीसह ग्रामीण भागात जनावरांसाठीही पिण्याच पाणी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.



