सोलापूर शहरातील जेष्ठ रेल्वे कर्मचारी विठ्ठल दामोदर कदम (वय – ९०, रा. कल्याण नगर, जुळे सोलापूर) यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. पंढरपुर लाईव्ह न्युज चे संपादक भगवान वानखेडे यांचे ते सासरे होत.
विठ्ठल कदम यांनी भारतीय रेल्वे मध्ये इलेक्ट्रीक डिपार्टमेंट मध्ये सलग ३४ वर्ष सेवा बजावली. आपल्या सेवा काळात एक कर्तव्यदक्ष व कुशल कर्मचारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. ऑगस्ट १९९२ मध्ये ते सेवावृत्त झाले. त्यांना वर्तमान पत्र, साहित्य वाचनाची विशेष आवड होती. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षांपर्यंत ते आपल्या परिसरातील नागरिकांची इलेक्ट्रीकल कामे करत असत. त्यांनी कधीच दुचाकी वापरली नाही. आवश्यक तेथे ते सायकलचा वापर करत.
दि. १६ जानेवारी २०२३ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी कल्याण नगरमधील पेपर स्टॉलवर पायी चालत जाऊन संचार, सकाळ आणि लोकमत ही वर्तमानपत्रे आणली, ती वाचली. दुपारचे जेवणानंतर ते झोपले. दुपारी ३ :३० वाजण्याच्या सुमारास झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यावर काल रात्री सोलापूर मधील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांसह, नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं, दोन मुली, दोन जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी सात वाजता त्यांचा तिसरा आहे.


