पंढरपूर Live 20 NOVEMBER 2017
गावांच्या सर्वांगीण विकासासाठी
मुंबई, दि.२० : ग्रामीण भागातील गावांच्या समुहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करण्यासाठी तसेच शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय रुरबन अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
मंत्रालयीन दालनात औरंगाबाद, बीड, जालना या ठिकाणच्या शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आमदार प्रशांत बंब, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, रुरबन अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावसमुहांच्या विकासासाठीचा सर्व निधी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेतून एक केंद्रभिमुखता (Convergence) द्वारे प्राप्त होणार आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांव्यतिरिक्त स्थानिक गरजांच्या आवश्यकतेनुसार गावसमुहांच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासू शकते. उदा. एखाद्या गावसमुहामध्ये मोबाईल हेल्थ युनिट पुरविणे, गावातील महिलांसाठी एखाद्या कुटीरोद्योग इ. प्रकारच्या गरजांसाठी योजनेंतर्गत कोणतीही तरतूद उपलब्ध नसते त्यामुळे स्थानिक गरजेनुसार अशी विकास कामे करण्यासाठी त्या संबंधीतला विस्तृत प्रकल्प अहवाल केंद्र शासनास सादर केल्यानंतर केंद्र शासनाच्या उणिवा निवारण निधी (Critical Gap Funding) मधून निधी उपलब्ध करुन दिला जातो.
हा निधी योजनांमधून मिळणाऱ्या निधीशिवाय अतिरिक्त निधी असतो. संपूर्ण उणिवा निवारण निधी हा केंद्र शासनामार्फत अभियानांतर्गत उपलब्ध करुन दिला जातो. निधी बिगर आदिवासी भागात प्रकल्प भांडवली मुल्याच्या ३० टक्के किंवा ३० कोटी रुपये यापैकी जो कमी असेल तो दिला जातो. तसेच आदिवासी भागात प्रकल्प भांडवली मुल्यांच्या ३० टक्के किंवा १५ कोटी रुपये यापैकी जो निधी कमी असेल तो दिला जातो असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्या योजना एक केंद्राभिमुख पध्दतीने राबवाव्यात
-बबनराव लोणीकर
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, गावसमुहांचा विकास करतांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना एक केंद्रभिमुख पध्दतीने राबवून कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम, मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा, उच्च शिक्षण सुविधा, स्वच्छता, नळाद्वारे पाणीपुरवठा, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गावांतर्गत गटारे, रस्त्यावरील दिवे, गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक, एल.पी.जी. गॅस कनेक्शन, डीजीटल साक्षरता आणि नागरिक सेवा केंद्र अशा बाबींचा विकास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय रुरबन अभियानाची
बीड जिल्हयात होत आहे प्रभावी अंमलबजावणी
बीड जिल्हयामध्ये दीन दयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात येत आहे. गावांतर्गत रस्त्यांची कामे झालेली आहेत. परळी तालुक्यात १९ गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. ही गावे स्मार्ट ग्रामच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. दीन दयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेंतर्गत शिरसाळा येथे ७२ घरांच्या वसाहतीचे काम प्रगतीपथावर असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





