पुणे शिवाजीनगरमधील मध्यवर्ती मॉडेल कॉलनीत घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल 4 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 29 ते 30 जानेवारीला चिंतामणी अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी शिवानंद भोगशेट्टी (वय 64, रा.
चिंतामणी सोसायटी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद हे मॉडेल कॉलनीतील चिंतामणी सोसायटीत राहायला आहेत. 29 आणि 30 जानेवारीला लग्नसमारंभासाठी सोलापूरला गेले होते.
त्यावेळेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 30 हजारांची रोकड आणि दागदागिने असा 4 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला. सोलापूरहून माघारी आल्यानंतर शिवानंद यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली .याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करीत आहेत.



