एटीएमबाहेर लांबच लांब रांगा

Loading

    • मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण स्टेट बँकेत करण्याच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले. या संपामुळे बँकेतील रोख व्यवहार आणि धनादेश वटणे बंद असल्याने ग्राहकांना व्यवहारासाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या स्थितीमुळे एटीएम मशिनबाहेर मात्र ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही बँकांबाहेर पैसे आणि चेक भरण्यासाठी स्वयंचलित मशिन लावण्यात आल्या आहेत. मात्र सायंकाळनंतर मशिनमधील रोख स्वीकारण्याची मर्यादा संपल्यानंतर त्या मशिनही बंद पडल्या.
      महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनने पुकारलेल्या या संपात राज्यातील २५ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ८ विदेशी बँका आणि १२ खाजगी बँकांचे सुमारे साडेतीन लाख कर्मचारी सामील झाल्याची माहिती फेडरेशनचे सरचिटणीस विश्वास उटगी यांनी दिली. उटगी म्हणाले की, स्टेट बँकेच्या व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना संपाचा पवित्रा घ्यावा लागला. हा प्रश्न केवळ विलीनीकरण होणाऱ्या स्टेट बँक आॅफ मैसूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक आॅफ पटियाला व स्टेट बँक आॅफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँकांपुरता मर्यादित नाही; कारण या धोरणाला विरोध केला नाही, तर अन्य राष्ट्रीयीकृत बँकांतून कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीत एकतर्फी बदल केले जातील. बँकिंग क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा संकोच करणे व खाजगी बँकांच्या विस्ताराला वाव देणे हे धोरण जोरात रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याविरोधात हा लढा पुकारला असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संघटनेची देशव्यापी बैठक १४ जानेवारीला चेन्नई येथे होणार असल्याचे उटगी यांनी स्पष्ट केले. 
      सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांच्या थकीत व बुडीत कर्जाची वसुली करण्यासाठी कठोर कायदा तयार करण्याची मागणी घेऊन देशातील ३० हजार बँक कर्मचारी दिल्लीला धडक देणार असल्याचे उटगी यांनी सांगितले.
      मार्च महिन्यात दिल्लीतील जनपथ ते जंतरमंतर मैदान अशी भव्य रॅली काढून कर्मचाऱ्यांतर्फे राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
      आझाद मैदानावर निदर्शने
      स्टेट बँकेच्या निर्णयाविरोधात संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात निदर्शने केली. या वेळी स्टेट बँकविरोधात घोषणाबाजी करून संघटनेने दिल्ली आंदोलनाची घोषणा केली.

  • +++

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *