श्री-जान्हवी करणार पुनरागमन?

Loading

  • मुंबई, दि.१३ – अतिशय समजूतदार नायक-नायिका, नायकाच्या सहा प्रेमळ आया तर नायिकेची खाष्ट आई.. या सगळ्यांना प्रेक्षक आता लवकरच मिस करणार आहेत.. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर श्री-जान्हवीच्या बाळाचे आगमन झाले असून त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती होणार आहे. त्याच नोटवर गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ टीव्ही मालिकांच्या जगावर राज्य करणारी ‘होणार सून मी या घरची‘ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र असे असले तरी भविष्यात या मालिकेचे व श्री-जान्हवीचे पुनरागमन होऊ शकते, असे संकेत मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी दिले आहेत. ‘लोकसत्ता’ने दिलेल्या वृत्तानुसार कदाचित प्रेक्षकांना या मालिकेचा ‘सिक्वेल’ पाहायला मिळू शकतो.
    अतिशय कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर गारूड करणा-या या मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेतही अव्वल क्रमांक कायम राखला. श्री-जान्हवीची जोडी तर घराघरांत लोकप्रिय झाली. प्रत्येक तरूणीला श्री सारखा समंजस नवरा मिळावा असे वाटू लागले तर प्रत्येक तरूणाला आणि त्यांच्या आयांनाही जान्हवीसारखी गुणी, सालस, समंजस सून मिळावी अशी स्वप्ने पडू लागली. या मालितेमुळे श्री-जान्हवीची भबमिका करणारे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान या दोघांनाही तूफान लोकप्रियता मिळाली एवढचं नव्हे तर जान्हवीची खाष्ट आई शशिकलाही लोकप्रिय ठरली. त्यांनी लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड्स मोडत अनेक पुरस्कार पटकावले. चटपटीत संवाद, उत्कंठा वाढवणारं कथानक, सर्वच कलाकारांचा सहज अभिनय यामुळे प्रेक्षकांना मालिकेने आपलंसं केलं. मालिकेने नुकताच ७५० भागांचा टप्पाही पार केला होता. मालिकेतील ‘काहीही हा श्री’ हा डायलॉग आणि जान्हवीची असंख्य महिने लांबलेली डिलीव्हरी या विषयांवरून तर सोशल मीडियावर विनोदांना उधाण आलं होतं. एवढ सगळं असतानाही मालिकेची लोकप्रियता तसूभरही घटली नाही. त्यामुळेच ही मालिका बंद होण्याच्या वृत्ताने अनेक जण दु:खी झाले. येत्या २३ जानेवारी रोजी मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित होणार आहे. 
    मात्र असं असलं तरी श्री- जान्हवी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतात. रसिकांच्या भरघोस प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे ही मालिका परत पडद्यावर येऊ शकेल, असे देवस्थळी यांनी नमूद केले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *