विमान न मिळाल्याने हृदयाची धडधड थांबली

Loading

औरंगाबाद : नियोजित विमान उपलब्ध न झाल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या एका २४वर्षीय तरुणाचे हृदय वेळीच चेन्नईला पोहोचू शकले नाही. दुसऱ्या कंपन्यांच्या विमानांनी, पायलटने नकार दिल्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड कायमची थांबली. मात्र या तरुणाच्या किडन्या आणि लिव्हरचे यशस्वी प्रत्यारोपण झाल्याने तिघांच्या आयुष्याला नवा प्रकाश मिळाला.
राम मगर या अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाचा अपघातामध्ये ‘ब्रेन डेड’ झाला. त्यानंतर त्याच्या किडन्या, लिव्हर आणि हृदय दान करण्यासंदर्भात त्याच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. अवयवदानाच्या माध्यमातून आपला राम पुन्हा एका कोणामध्ये तरी पाहता येईल, या भावनेने त्यांनी त्यास तत्काळ होकार दिला होता. त्याची एक किडनी धूत हॉस्पिटल, तर दुसरी किडनी आणि लिव्हर मुंबई येथील रुग्णाला दान करण्यात आली. तर, हृदयाचे चेन्नई येथील रुग्णास प्रत्यारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार ओरिया एव्हिएशनच्या वतीने चेन्नईसाठी चार्टर्ड विमान देण्यात येणार होते. त्यासाठी गुरुवारी रात्री ११ वाजता चिकलठाणा विमानतळावरून हे विमान उड्डाण करणार होते. सूचना मिळताच मुंबई येथून औरंगाबादला विमान आल्यानंतर या वेळेला चेन्नईसाठी रवाना होणार होते; परंतु ओरिया एव्हिएशन यांना दिलेली वेळ बदलून दुपारी १ वाजेची करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही वेळ पुढे ढकलण्यात आली. रात्री ९.३० वाजेची वेळ निश्चित करण्यात आली; परंतु या वेळेत विमानाचे उड्डाण शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मध्यरात्री १ वाजेची वेळ ठरवण्यात आली; परंतु शुक्रवारी सकाळी ९ वाजता अन्य ठिकाणाचे बुकिंग असल्यामुळे उड्डाण शक्य नसल्याचे ओरिया एव्हिएशनचे सीईओ राजेश साहू यांनी सांगितले. त्यामुळे अन्य विमानाची, एअर अ‍ॅब्युलन्सची शोधाशोध करण्यात आली; परंतु त्यास यश मिळाले नाही. त्यामुळे अधिक उशीर झाल्याने हृदयाचे प्रत्यारोपण शक्य झाले नाही.
हृदयाचे प्रत्यारोपण चेन्नई येथील रुग्णावर करायचे होते; परंतु ते झाले नाही. हृदयाचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही, याचे दु:ख करण्यापेक्षा तीन अवयवांचे प्रत्यारोपण झाले, ही मोठी गोष्ट आहे.
– डॉ. आनंद देवधर, हृदयशल्यचिकित्सक, सिग्मा हॉस्पिटल

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *