पंढरपूर, दि. 21 :– सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांना 100 टक्के अनुदान देण्याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे निवासी शाळेच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला जाईल असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
एखतपूर (ता. सांगोला) येथे भारतीय संस्कृती शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित अनुसूचित जाती केंद्रीय निवासी माध्यमिक शाळेच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक वितरण व वसतीगृहाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, माजी आमदार दिपक साळुंखे उपस्थित होते.
राज्यमंत्री कांबळे म्हणाले, राज्यातील निवासी शाळेच्या अनुदानाबाबत येत्या अर्थसंकल्पामध्ये तरतुद करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याने या शाळांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. एखतपूर येथील केंद्रीय निवासी शाळेच्या बालगृहास शासनाकडून मंजुरीसाठी योग्य तो पाठपुरावा करुन हा प्रश्नही मार्गी लावला जाईल. शासनाने 123 अपंग शाळांना अनुदान दिले असल्याचेही राज्यमंत्री कांबळे यांनी यावेळी सांगितले.
एखतपूर येथीलअनुसूचित जाती केंद्रीय निवासी माध्यमिक शाळेने प्रतिकुल परिस्थितीत केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. या शाळेचा आदर्श घेऊन समाजातील दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढे यावे अशी अपेक्षाही राज्यमंत्री कांबळे यांनी व्यक्त केली. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले असून या अभियानाच्या माध्यमातून गावा-गावातील नदी, नाले, ओढ्यातील गाळ काढण्यात येत आहे. यामुळे पाणी साठा वाढून दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे तसेच राज्य दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेमार्फत केंद्रीय निवासी माध्यमिक शाळेस पाण्याची टाकी मंजूर करुन दिली जाईल असे जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड यानी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल म्हणाल्या, भैय्युजी महाराज यांच्या प्रेरणेतून या शाळेने केलेले काम हे इतरांना प्रेरणादायी आहे. शाळेतील मुलांवर उत्तम संस्कार केले जातात ही गौरवाची बाब असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, संस्थेचे मार्गदर्शक साईनाथ अभंगराव यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी राज्यमंत्री कांबळे यांच्या हस्ते वसतीगृहाच्या भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. शेवटी जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवातील विजेत्या मुलांना पारितोषिकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समारंभास संस्थेच्या अध्यक्षा मधुमती साळुंखे-पाटील, सचिव डॉ. नेहा साळुंखे-पाटील, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या राणी दिघे, मुख्याध्यापक जिजाभाऊ घुले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.