खुशखबर.. आता शेतक-यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार…

Loading

खुशखबर.. आता शेतक-यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार…

3 May. 2017

सोलापूर दि ३ : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आता थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे राज्य शासनाने प्रस्तावित केले आहे़ यासंदर्भात पणन विभागाने मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव मांडला आहे़ दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची गठीत करण्यात आली आहे़ या समितीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली़

बाजार समित्याच्या कार्यक्षेत्रातील सातबारा धारक शेतकरी व साखर कारखान्यांच्या धर्तीवर जे शेतकरी बाजार समित्यांना शेतमाल पुरवठा करतात अशा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले़ महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या शेतमालास स्पर्धात्मक दर मिळावा, एकत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली़ राज्यात ३०६ बाजार समित्या आहेत़ या बाजार समित्यांमध्ये धान्य, फळे, भाजीपाला याची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री होत असते़ सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात जवळपास ६५ हजार कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे़ या बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात शेतमालाचा खरेदीविक्रीचा व्यवहार होतो़ परंतू बाजार समिती संचालक मंडळात शेतकरी कुठेच नाही़ या समित्या त्यांच्या उद्दिष्टांपासून दूर जाताना अनेकवेळा पहावयास मिळते़ ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर समित्या चालतात त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा प्रतिनिधी असावा या उद्देशाने आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *