Pandharpur Live 8 May 2017
पंढरपूर प्रतिनिधी –
सध्या शिक्षण क्षेत्रात विविध संक्रमण होत आहेत अध्यापनाच्या काम व्यतिरिक्त इतर कामे शिक्षकांना जास्त करावी लागतात .त्यामुळे त्यांची मानसिकता ढासळत आहे त्यांना मानिसक बळ देण्यासाठी पुरस्काराने सन्मानित करणे आवश्यक आहे असे मत शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती तर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षक सेनेचे प्रदेश अध्यक्ष ज.मो.अभयंकर जे होते.या वेळी कृती समितीचे प्रदेश सचिव आमदार दत्तात्रय सावंत सह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार श्रीकांत देशपांडे म्हणाले, सहाव्या वेतन आयोगामध्ये राज्यातील शिक्षकांवर अन्याय झाला होता. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाची केंद्राप्रमाणे राज्यात अंमल बजावणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, वेळ प्रसंगी शिक्षकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करणार आहे. नागपूरला पायी दिंडी आंदोलन केल्याने विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकांना 20 टक्के वेतन मिळाले वंचितांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षक सेनेचे प्रदेश अध्यक्ष ज.मो अभ्यंकर यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलाची माहिती देऊन सकारात्मक बदल घडविण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. पुरस्काराला उत्तर देताना लेखाधिकारी अजित शिंदे म्हणाले, आमदार दत्तात्रय सावंत यांनी एकही चुकीचे काम करण्यास सांगितले नाही तर बरोबर असलेल्या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला त्यांचा आदर्श घेऊन काम करताना पुरस्कार मिळाला .त्यामुळे यापुढे ही अधिक जोमाने काम करीत राहीन असे सांगितले.
गुणवान शिक्षकांचा सन्मान होणे आवश्यक-आमदार सावंत
प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावर काम करणाऱ्या प्रत्येक गुणवान शिक्षकांचा सन्मान होणे आवश्यक आहे.पुरस्काराने त्यांना प्रेरणा मिळावी व देशाची भावी पिढी आदर्श घडावी या साठी शाळा कृती समिती सातत्याने प्रयत्न करेल असे आश्वासन पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिले.




