पाइपलाइन खोदाईने रस्त्यावर पडलेत अनेक खड्डे
राजेगाव,(वार्ताहर) – येथील कर्जत-बारामती राज्यामार्गावर खेड नजीक पाइपलाइन खोदाईने मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की या खड्यात अनेक लहान-मोठी वाहने पडून अपघात घडत आहेत. मध्यंतरी काळात “एक खड्डा दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती.या अनुषंगाने राज्यात डिसेंबरअखेर एकही खड्डा राहणार नसल्याच्या या घोषणेचा सध्या मोठा फज्जा उडाला आहे. अनेक तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था “जैसे थे’च असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढच होत चालली आहे.
राजेगाव आणि येथील अनेक गावांच्या शेतीसाठी उजनी पाणलोट क्षेत्राचा मोठा लाभ होत आहे. त्यामुळे राजेगावसह अनेक गावांच्या पाणी योजना, शेतीसाठी कूपनलिका भीमा नदीवरूनच नेण्यात आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी पाइपलाइनचे जाळेच या राज्यमार्गावरून नेले आहे. एका चारीतून सुमारे दहा ते बारा पाइप गाडून नेल्याने रस्त्यावर मोठे भगदाड तयार झाले आहे. हे मोठे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित शेतकरी काहीच उपाययोजना करीत नसल्याने आता याचा नाहक त्रास प्रवासी आणि वाहन चालक यांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांवर पाइपलाइन खोदाई करण्यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेऊन त्याची रक्कम अदा करावी लागते. मात्र, खोदाई करून ते खड्डे जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. याबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




