
अहमदनगर – पैशांच्या कारणावरून स्वत:च्या वडीलांचा खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील पिसेवाडी येथे घडली आहे. मयत पित्याचे नाव रामभाऊ धोंडीबा धराडे (वय ६५) असे असून आरोपी पांडूरंग रामभाऊ धराडे (वय ३८) यास अकोले पोलीसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
अकोले पोलीसांनी यासंदर्भात दिलेली माहिती अशी की, फिर्यादी धर्मा रामभाऊ धराडे यांनी अकोले पोलीसांत तक्रार दिली आहे. या संदर्भात हकीकत अशी की, फिर्यादी धर्मा धराडे हे एस.टी. महामंडळामध्ये कंडक्टर असून आरोपी पांडूरंग रामभाऊ धराडे व ते दोघे सख्ये भाऊ आहेत.
हे दोघेहे मयत वडील रामभाऊ धोंडीबा धराडे यांची शेती करीत होते. त्यांनी वडीलांची बैलजोडही विकली. या भावांची घरेही पिसेवाडी येथे शेजारी-शेजारी आहेत. फिर्यादी धर्मा धराडे यास त्याचा भाऊ आरोपी पांडूरंग धराडे याचा फोन आला की, वडील रामभाऊ यांना अॅटॅक आला असून ते मयत झाले आहेत. त्यानंतर मयत रामभाऊ यांचा अंत्यविधी झाला. यानंतर दोन दिवसांनी या दोघा भावांची आई मोठय़ामोठय़ाने रडू लागली.
मग तिने फिर्यादीस सर्व घटना सांगितली. आरोपी पांडूरंग याने वडील रामभाऊ यांना विटा व काठय़ांनी मारहाण केली. यामध्ये ते मृत्युमुखी पडले. यानंतर आरोपीने आईला तू याबाबत काही बोललीस तर बघ, असा दम भरला. यावेळी आरोपीचे सासरे, पत्नी, भाची हजर होती, अशीही कबुली आरोपीने दिल्याचे पोलीसांनी सांगितले.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अकोले पोलीसांनी आरोपी पांडूरंग रामभाऊ धराडे याच्या विरुद्ध गुन्हा रजि. नं.७८/२०१७ भादंवि कलम ३०२, २०१, १२० (ब) ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पो.नि.अविनाश शिळींबकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या गुन्ह्याच्या तपासकामी त्यांना पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांच्यासह सागर निपसे, कुंडारे, सय्यद,कोळपकर यांनी मदत केली.




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111