पंढरपूर शहर हे भारताची दक्षिण काशी म्हणुन प्रसिद्ध आहे. श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या
दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे शहरातील
असणारी लोकसंख्या व यात्रेकरुंची वाहने यामुळे शहरातील वाहतुक व पार्किंग व्यवस्थेवर
परिणाम होवुन शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडल्याने नागरीकांना व्यापा-यांना याचा
त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पुढाकार घेवुन
पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांची वाहतुक व पार्किंग व्यवस्थेबाबत एकत्रित बैठक
आयोजीत केली होती. सदरची बैठक नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष
सुजाता त्रिंबक बडवे, सहा.पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, व.पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे,
माजी,नगरसेवक सचिन डांगे मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिनेश शास्त्री,
जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी शहरामध्ये
लिमये वाडा, श्री.गजानन महाराज मठ पिछाडी, अंबाबाई पटांगण, जुने बस स्थानक,
पद्मसाळी मठासमोर आरक्षण क्र.५६ झेंडा चौक, आरक्षण क्र.३५ जिजामाता उद्यान समोर,
आरक्षण क्र.३१ खादी ग्रामोद्योग, नदी पलीकडील ६५ एकर व नव्याने होणारे, खादी
ग्रामोद्योग पिछाडी या एकुण १० ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु
येणारे भाविक सदरची वाहने पार्किंगच्या ठिकाणी न लावता, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्गावर
वाहने लावुन दर्शनाला जात असल्याने या रस्तावर असलेल्या दुकानदारांना वाहने दुकाना
समोर लावल्याने त्रास होत असल्याने संबंधीत व्यापा-यांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी
केल्या आहेत. तसेच स्टेशन रोडवरील बँक ऑफ इंडिया, दामोदर मार्केट, अर्बंन बँक, भादुले
चौक, नाथ चौक, संपुर्ण प्रदक्षिणा मार्गावर हातगाडे व वाहने लावल्याने सदरची अतिक्रमणे
काढल्याशिवाय व वाहने लावण्यास प्रतिंबंध केल्याशिवाय शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत
होणार नाही असे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केले. यावर उपाय म्हणुन शहरातील काही रस्ते
वन वे (एकेरी वाहतुक मार्ग) करणे आवश्यक असल्याने नाथ चौक ते भादुले चौक हा रस्ता वन
वे करण्याचा निर्णय या बैठकीत करण्यात आला. तसेच रस्त्यावर उभारलेली वाहने
काढण्यासाठी एक अतिक्रमण पथक तयार करुन व यासाठी क्रेनसहीत वाहन उपलब्ध करुन
द्यावे. या पथकासोबत पोलीस यंत्रणा राहील व हे पथक संबंधीत वाहन धारकावर कारवाई
करेल. तसेच नगरपरिषदेने वाहन धारकावर कारवाई करणेसाठी जॅमर उपलब्ध करुन देणार
आहे. तसेच शहरातील प्रदक्षिणा मार्ग, छत्रपती शिवाजी चौक – भादुले चौक – अर्बंन बँक –
नाथ चौक – संपुर्ण प्रदक्षिणा मार्ग हा नो पार्किंग झोन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील
काही भागात सम विषम तारखेला वाहने लावण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार
आहे. विशेषत: स्टेशन रोड वरील बेशिस्त वाहन धारकांवर कारवाई करुन वाहने पार्किंगच्या
ठिकाणीच लावण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शहरात हॉकर्स झोन व नो हॉकर्स
झोन तयार करुन नो हॉकर्स झोन मध्ये उभा असणा-या अतिक्रमण धारकावर कारवाई करुन
वाहतुकीस अडथळा करणारे सर्व अतिक्रमणे काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
शहरामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विद्यत पोल रस्त्यावर असल्याने याचा गैरफायदा
घेवुन काही व्यापारी अतिक्रमण करित आहेत. त्यामुळे सदरचे विद्युत पोल त्वरीत एका कडेला
घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच स्वा.सावरकर चौक येथील बंद असलेला सिग्नल चालु
करुन शहरातील भादुलै चौक, अर्बंन बँक,छ.शिवाजी चौक या चौकांमध्ये नव्याने सिग्नल
बसविण्याचे प्रस्ताव सादर करावेत. असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आमदार प्रशांतराव
परिचारक यांनी नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने ही कामे त्वरीत मार्गी
लावावीत व शहरात येणा-या भाविकांना व नागरीकांना होणा-या त्रासापासुन दिलासा द्यावा
अशा सुचना दिल्या.यावेळी लिपीक चिदानंद सर्वगोड भिकाजी मगर हे उपस्थीत होते.





