👁 9 Views

सोन्याच्या दागिन्यांना फसवणुकीचे “पॉलिश’

पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक : दोन संशयितांचा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये धुमाकूळ
ज्येष्ठ महिला टार्गेट; हिप्नॉटिझमचाही होतोय वापर
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलांना लुटणाऱ्या टोळीने हैदोस घातला आहे. मागील तीन ते चार महिन्यांत पोलीस दप्तरी तब्बल अर्धा डझन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र गुन्हेगारांना जेरबंद करण्यास पोलिसांना अपयश आले आहे.
घराबाहेर उभ्या असलेल्या एकट्या महिलांना हेरुन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या महिलांना सोन्याच्या दागिन्यांना मोफत पॉलिश करुन देण्याचे आमिष दाखवले जाते. यानंतर हातचलाखी करुन दागिने चोरले जात आहेत. पुणे व पिंपरी -चिंचवड शहरात आजवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये दोन व्यक्तींनी एकत्र येऊन हे गुन्हे केले आहेत. या व्यक्तींचे वर्णनही अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना मिळाले आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याचे फसवणूक होण्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत होते. त्यातील काही गुन्ह्यांमधील आरोपी अटक झाल्यानंतर हे प्रकार थांबले होते. यातील काही गुन्ह्यांमध्ये हिप्नॉटिझमचा प्रकारही पुढे आला आहे. हे गुन्हेगार गुन्हे करण्याची एक समान पध्दत वापरत आहेत.
गुन्हे करणाऱ्या दोन व्यक्ती असल्याने एकाच टोळीकडून हे गुन्हे होत असल्याचे प्रथम दर्शनी दिसते. मात्र मागील पाच ते सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होऊनही गुन्हेगारांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे. यामध्ये ज्येष्ठ महिलांना टार्गेट केले जात आहे.
अशी आहे फसवणुकीची पद्धत
यामध्ये पावडर कंपनीच्या प्रमोशनसाठी आलो असल्याचे सांगत मोफत सोने पॉलिश करुन देण्याचा बहाणा केला जातो. यासाठी दुपारी किंवा सायंकाळी घराबाहेर उभ्या असलेल्या एकट्या महिलेला हेरले जाते. घरात कोणी नसल्याचा फायदा उठवत महिलेला बोलण्यात गुंतवले जाते. यानंतर पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने घेतले जातात. हे दागिने हळदीच्या पाण्यात बुडवून कुकरमध्ये टाकले जातात. यानंतर कुकर गॅसवर ठेऊन तो थोड्या वेळाने बंद करुन दागिने काढायला सांगितले जातात. दरम्यान हातचलाखी करुन दागिने लंपास केलेले असतात.
*29 एप्रिल 2017 (एमआयडीसी पोलीस स्टेशन): फिर्यादी 28 वर्षीय महिला घराबाहेर उभी असताना पितळीची भांडी व दागिने चमकवायची पावडर घेता का? अशी विचारणा दोघांनी त्यांना केली. महिला नकार देऊन घरात जातात दोघेही त्यांच्या पाठोपाठ घरात गेले. यानंतर महिलेला बोलण्यात गुंतवून 37 हजार रुपयाचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याचे हातचलाखी करुन फसवणूक केली.
*13 मे 2017 : बनुबाई कुटे (82, रा. शांतीनगर) या ओट्यावर बसल्या असताना दोघांनी “आजी तुमच्या गळ्यातील दागिन्यांना पॉलिश करुन देऊ का ?’ अशी विचारणा करत रुमाल झटकला. यामुळे त्यांनी गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे 30 हजाराचे गंठण काढून पॉलिश करायला दिले. त्याला हळद व पावडर लावून कुकरमध्ये ठेऊन कुकर गॅसवर ठेवला. यानंतर हातचलाखीने दागिने घेऊन दोघेही पसार झाले.
* 21 मे 2017 (दिघी पोलीस स्टेशन) : कविता तापकिर (32, रा. चऱ्होली) यांना घरातील भांडी व दागिने पॉलिश करुन देतो, असे सांगत दोघे घरात घुसले. त्यांचे मंगळसूत्र डब्यातील रंगीत पाण्यात डाकून डबा गॅसवर ठेवायला लावला. यानंतर बोलण्यात गुंतवून 30 हजाराचे मंगळसूत्र डब्यातून काढून पळ काढला.
* 29 मे 2017 (वानवडी पोलीस स्टेशन)- एका 60 वर्षीय महिलेस दागिने पॉलिश करुन देतो असे सांगत , हात चलाखीने 60 हजाराचे सोन्याचे दागिने घेऊन दोघांनी पळ काढला.
* 2 जून 2017 (भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन)- एक 62 वर्षीय महिला राजस सोसायटी येथे भजनाला गेल्या असता त्यांच्या जवळ दोघांनी येऊन दागिन्यांना पॉलिश करायची पावडर असल्याचे सांगितले. यानंतर सोन्याचे दागिने कंपनीच्या जाहिरातीसाठी विना पैसे पॉलिश करुन देतो असे सांगितले. यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र रुमालामध्ये ठेऊन पॉलिश करण्याचा बहाणा करत हातचलाखीने काढून घेतले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *