👁 10 Views

अभियांत्रिकी प्रवेश आजपासून

नागपूर, ४ जून
प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी प्रवेश कक्षामार्फत दि. ११ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेचा निकाल दि. ४ जून रोजी जाहीर केला जाणार होता. मात्र, कक्षाने एक दिवस आधीच शनिवारी सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन निकाल जाहीर केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गुणवत्तेत मात्र घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ५३ विद्यार्थ्यांना १९० पेक्षा अधिक गुण मिळाले होते, यंदा मात्र ही संख्या १० पर्यंत खाली आली आहे. शंभरपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍यांची संख्याही घटली असल्याचे निरीक्षण अधिकार्‍यांनी नोंदवले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ५ जूनपासून याला प्रारंभ होत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ जून आहे. राज्यभरातील महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणार्‍या जागा भरण्याचे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. मात्र यंदा ‘जेईई’ व ‘एमएचटी-सीईईटी’ला बसलेले विद्यार्थी व बारावीचा निकाल लक्षात घेता यंदा महाविद्यालयांना काहीसे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कशी असेल प्रक्रिया ?
प्रवेशाची सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. अगदी अर्ज भरण्यापासून ते अर्जनिश्‍चिती आणि विकल्प अर्ज या सर्व गोष्टी ऑनलाईन करायच्या आहेत. अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा ३ प्रवेश फेर्‍या असतील. पहिल्या, दुसर्‍या फेरीसाठीच्या अर्जात पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. अखेरच्या फेरीत मात्र ‘कौन्सिलिंग’द्वारे प्रक्रिया राबविली जाईल. पहिल्या व दुसर्‍या फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पहिली प्राथमिक यादी १९ जून तर अंतिम यादी २२ जून रोजी ‘डीटीई’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
शुल्करचना
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राज्यातील विविध महाविद्यालयांचे शुल्क साठ हजारांपासून ते सव्वा लाख रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे आकारले जाते.
सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळ : : www.sssamiti.org
महाविद्यालय निवडताना
– महाविद्यालयाचे संकेतस्थळ जरूर पाहावे. त्या महाविद्यालयात झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटची माहिती मिळवावी. महाविद्यालयाचे शुल्क शिक्षण शुल्क समितीच्या संकेतस्थळावरून  (www.sssamiti.org) करून घ्यावे. त्यानंतरच महाविद्यालयाची निवड करावी.
– तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर गेल्या वर्षीचे सर्व महाविद्यालयांचे शाखानिहाय ‘कटऑफ’ गुण उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करून आपल्याला मिळालेल्या गुणांच्या आधारे कोणती महाविद्यालये आणि शाखा मिळू शकतात, याचा अभ्यास करा.
– विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५ टक्के जागा या जेईई-मेनच्या गुणांवर भरल्या जाणार आहेत.
शाखा निवडताना
– मित्र किंवा शेजारी यांच्या ऐकीव माहितीवर शाखेची निवड करू नये.
– आपल्या आवडीच्या विविध शाखांची माहिती त्या क्षेत्रातील एखाद्या शिक्षक वा अभियंत्याकडून जाणून घ्यावी.
– या शाखेमध्ये पुढे मिळू शकणार्‍या नोकरीच्या, उच्च शिक्षणाच्या, परदेशी जाण्याच्या संधीची माहिती करून घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे
– बारावीची गुणपत्रिका
– शाळा सोडल्याचा दाखला
– जात प्रमाणपत्र
– नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र
– जात वैधता प्रमाणपत्र
– अधिवास प्रमाणपत्र
वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज दाखल करणे ५ जून ते १७ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी १९ जून
अंतिम गुणवत्ता यादी २२ जून
पहिल्या फेरीसाठी ‘ऑप्शन फॉर्म’ २३ जून ते २६ जून
तात्पुरती वाटप यादी २८ जून
दुसर्‍या फेरीसाठी ‘ऑप्शन फॉर्म’ ५ जुलै ते ८ जुलै
तात्पुरती वाटप यादी १० जुलै
तिसर्‍या फेरीसाठी ‘ऑप्शन फॉर्म’ १६ जुलै ते १९ जुलै
तात्पुरती वाटप यादी २१ जुलै
विभागाची एकूण जागा
नागपूर विभागातून ४२ हजारावर विद्यार्थ्यांनी एमएचसीईटी परीक्षा दिली. अभियांत्रिकीची विभागात एकूण ४८ महाविद्यालये आहेत. यात २४ हजारावर जागा आहेत. ३०० शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात जागा आहेत. एकूण अर्जाच्या तुलनेत अर्ज संख्या दुप्पट आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *