सरकारवर चौफेर टीका
मध्य प्रदेशात आंदोलनादरम्यान केलेल्या गोळीबारात शेतकरी जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. परिस्थितीवर नियंत्रण नियंत्रणात आणण्यासाठी अनेक ठिकाणी लाठिमार करावा लागला होता. तर मध्य प्रदेशात मंदसौर येथे आंदोलनावेळी केलेल्या गोळीबारात ५ शेतकऱ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर विरोधक आणि सर्वसामान्यांतून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे. भाजप महाराष्ट्रात ‘यमराज’, तर मध्य प्रदेशात आंदोलक शेतकऱ्यांना ‘जनरल डायर’सारखंच मारत आहे, अशी तिखट टीका काँग्रेसने केली आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी काही दिवसांपासून महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. तर मध्य प्रदेशातही शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ५ शेतकऱ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर तोफ डागली आहे. सरकारने मंदसौर, रतलाम आणि उज्जैनमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या योग्य मागण्या मान्य करण्यात येतील, असे जाहीर केले आहे. तर आंदोलनादरम्यान गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्यात वाढ करून एक कोटी रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असली तरी, विरोधक मात्र, आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप आणि सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात भाजप शेतकऱ्यांसाठी यम बनले आहे. तेथे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर मध्य प्रदेशात आंदोलक शेतकऱ्यांना हे सरकार जनरल डायरनं जसं आंदोलकांना मारलं होतं. तसं मारत आहे, अशी तिखट टीका काँग्रेसचे शहजाद पूनावाला यांनी केली आहे. तसेच आम आदमी पक्षाचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी कवितेच्या माध्यमातून भाजप सरकारला ‘हत्यारा’ म्हटलं आहे. ‘जो धरापूत्र का वध कर दे, वह राजपुरुष नाकारा है, जिस पर किसान का रक्त गिरे उस का शासक हत्यारा’ असं त्यांनी कवितेतून म्हटलं आहे. स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव यांनीही सरकारवर टीका केली आहे. मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार म्हणजे मध्य प्रदेश सरकार किती निष्ठूर आहे, हे दर्शवते, असं त्यांनी म्हटलं आहे. तर हे सरकार गरीब विरोधी सरकार असल्याचे प्रशांत भूषण यांनी म्हटलं आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





