एकूण सहा जणांचे उमेदवारी अर्ज
राष्ट्रपती भवन (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रपतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं बुधवारी अधिसूचनाही जारी केली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात मुंबईतील सायरा बानो मोहम्मद पटेल आणि मोहम्मद पटेल अब्दुल हामिद या दाम्पत्याचाही समावेश आहे. त्यांच्यापैकी एकाला राष्ट्रपती व्हायचं आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (रालोआ) १७ पक्षांचे पाठबळ असल्याचा दावा बुधवारी राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी केला होता. राष्ट्रपतीपद निवडणुकीत एनडीएचे पारडे जड असणार आहे. २५ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी म्हणजेच २३ जूनला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल, ते जाहीर होईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. विरोधी पक्षांच्या गोटात नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज एनडीएला घ्यायचा आहे. कारण विरोधकांतर्फे कोणाचे नाव सुचविले जाणार आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात मुंबईचं दाम्पत्यही आहे. राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याचं त्यांचं स्वप्न आहे. सायरा बानो मोहम्मद पटेल आणि मोहम्मद पटेल अब्दुल हामिद या दाम्पत्यासह ६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात तामिळनाडूतील के. के. पद्मराजन, मध्य प्रदेशचे आनंद सिंह कुशवाहा, तेलंगणातील के. ए. बाला राज आणि पुण्यातील कोंडेकर विजय प्रकाश यांचा समावेश आहे. पण ५० अनुमोदकांची स्वाक्षरी अनिवार्य असल्याची निवडणूक आयोगाची अट या सर्वांनी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या सर्वांचे अर्ज अवैध ठरू शकतात, असंही बोललं जातंय. दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी २८ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. २० जुलैला मतमोजणी होईल. यावेळी एकूण ७७६ खासदार आणि ४१२० आमदारांना राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




