👁 8 Views

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे आयोजन.

विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत तर्फे 
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे आयोजन.
(वारकरी भाविकभक्तांसाठीचा एक अभिनव उपक्रम)

पुणे, दि.२७ जून : विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.२ जुलै २०१७ रोजी दुपारी १.३० ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्‍वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून “श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या आहेत.  स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. 
सदरील ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’ आयोजित करण्यामागे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या 
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठीण वज्रासी भेदू ऐसे ॥
व समर्थ श्री रामदास यांच्या 
शक्तीने मिळती राज्ये। युक्तीने कार्य होतसे॥
या वचनांद्वारे निर्देशित केलेल्या भागवत् संप्रदायाच्या परंपरेनुसार वारकर्‍यांचे ठायी अत्यंत भक्तीपूर्ण व संवेदनशील असे मन व पोलादासारखे कणखर शरीर यांचा यथायोग्य संगम असला पाहिजे, या सद्भावनेने आणि वारकरी भाविकभक्तांचे एक आगळेवेगळे दर्शन जगाला घडविण्यासाठीचा हा एक विनम्र प्रयत्न आहे.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील अठरा पगड जातीधर्माच्या मावळ्यांना व शेतकरी-कामगार वर्गातील लोकांना एकत्रित करुन, सामर्थ्यशाली अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपतींचेच समकालीन समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात वायुपुत्र हनुमानाच्या मंदिरांची स्थापना करुन, शरीरसौष्ठव व बलोपासनेचे महत्त्व जनसामान्यांना पटवून दिले. 
या ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर’ स्पर्धेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील ‘भक्ती आणि शक्ती’चा एक अनोखा संगम वाखरी तळावर पहायला मिळेल, याची आयोजकांना खात्री वाटते.
 स्पर्धकांचे वयोगट व बक्षिसे पुढीलप्रमाणे –
(प्रथम क्रमांक – सुवर्ण पदक,  द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्य पदक व रोख रक्कम पुढे दिल्याप्रमाणे)
     वयोगट          प्रथम क्रमांक       द्वितीय क्रमांक         तृतीय क्रमांक
   १६ ते २५ वर्ष        रु. ३,०००/-                रु. २,०००/-               रु. १,०००/-
   २६ ते ३५ वर्षे         रु. ४,०००/-                रु. ३,०००/-                रु. २,०००/-
   ३६ ते ४५ वर्षे     रु. ५,०००/-                रु. ४,०००/-                रु. ३,०००/-
   ४६ ते ५५ वर्षे,          रु. ६,०००/-        रु. ५,०००/-                रु. ४,०००/-
   ५६ ते ६५ वर्षे           रु. ७,०००/-       रु. ५,०००/-                रु. ४,०००/-
   ७० वर्षाच्या पुढे रु. ५,०००/-               रु. ३,०००/-                रु. २,०००/-
विशेष बाब म्हणजे, थोर स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्य शास्त्रातील एक महान चमत्कार,  योगमहर्षी, शतायुषी  वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरूस्त अशा  सत्तर (७०) वर्षे वयाच्या  पुढील मल्लांसाठी याच दिवशी  एक आगळी वेगळी विशेष कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ७० वर्षांच्या पुढील कुस्ती विजेत्याला ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
विजेत्या कुस्ती महावीरांचा सन्मान – मानाचा फेटा, माऊलींची/जगद्गुरुंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, सुवर्ण/रौप्य/कांस्य पदके व रोेख रकमेची बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहेे. 
या समर्थ विष्णुदास महावीर कुस्तीस्पर्धेसाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा.श्री. रामराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महान भारत केसरी पै. दादू चौगुले,  महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मा. ना. श्री. बबनरावजी पाचपुते, पंढरपूरचे आमदार श्री. भारतनाना भालके, हिंद केसरी पै. गणपत आंदळकर ,  हिंद केसरी पै.श्रीपती खंचनाळेव हिंद केसरी पै. दीनानाथ सिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 वारकरी भाविक भक्तांमध्ये असलेल्या अमाप उत्साहाला आणि शक्तीला आवाहन करुन त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी संयोजकांची अपेक्षा आहे. 
 माईरचे अध्यक्ष डॉ.सुरेश घैसास,  रुई रामेश्‍वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी श्री. काशीराम दा. कराड, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस श्री. बाळासाहेब लांडगे, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे व विश्‍वस्त व सदस्य श्री.श्रीकांतदादा देशमुख  व वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव श्री. विलास कथुरे हे प्रमुख मार्गदर्शक असतील.
रविवार, दि.२ जुलै २०१७ रोजी सकाळी ७.३० वा. पासून  श्री. पी.  जी.धनवे   मो.नं. ९८२२६२६००६ व श्री. राजेंद्र रणभोर मो. नं. ९८८११०१६३० यांच्याशी संपर्क साधून वारकरी भक्तांनी आपली नावे नोंदवावीत.
 याच दिवशी रात्री ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत, वारकर्‍यांना अत्यंत प्रिय असलेल्या  शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे प्रसिध्द असलेले  “नाथांचे भारूड व गवळणी” यांच्या स्पर्धा   ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील या लोककलेला परत  संजीवनी मिळावी म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. 
अशी माहिती विश्‍वशांती केंद्र(आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा.कराड  यांनी दिली.
                                                                     
जनसंपर्क विभाग,

माईर्स एमआयटी,पुणे.
 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *