सोलापूर दि.28 :- महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ सोलापूर यांचे तर्फे विशेष घटक योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येणार आहे. या योजना लाभार्थी निवड प्रक्रीयेच्या माध्यमातून होणार आहेत.या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
विशेष घटक योजनेकरिता प्रकल्प मर्यादा रूपये 50,000/- पर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान देण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा रूपये 10,000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. तसेच अनुदान वगळून बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असणार आहे. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होईल व कर्ज फेड 36 ते 60 मासिक हप्त्यात बँकेकडे जमा करावी लागणार आहे आणि या योजने चा लाभ हा 400 लाभार्थीकरिता मर्यादित असणार आहे.
बीजभांडवल योजनेकरिता प्रकल्प मर्यादा रूपये 50,001/- ते 5,00,000/- पर्यंत आहे. रूपये 50,001/- ते 5,00,000/- पर्यंतच्या मंजूरकर्ज प्रकरणांमध्ये रूपये 10,000/- अनुदान वगळता बाकीच्या कर्जाच्या रकमेपैकी 5 टक्के अर्जदाराचा सहभाग असेल , 20 टक्के महामंडळाचे कर्ज असणार आहे ( रूपये 10,000/- अनुदानासह) आणि 75 टक्के बँकेचे कर्ज आहे. बँक कर्जाची परतफेड व्याजासह बँकेकडे जमा करावी लागणार आहे व महामंडळाचे कर्ज द.सा.द.शे 4 टक्के व्याजासह 36 ते 60 मासिक हप्त्यामध्ये परत करावे लागेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती ( मातंग, चांभार,ढोर,मोची,होलार या जातींना स्वतंत्र महामंडळ असल्याने यांना वगळून ) व नवबौध्द समाजातील असावा. त्याने यापुर्वी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेचा अर्ज महामंडळाची वेबसाईट htt://.mpbcdc.maharashtra.gov. in वर ऑनलाईन देखील भरता येईल. कार्यालयात अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्याचे वय 18 ते 50 वर्षा आतील असणे आवश्यक आहे.अर्जा सोबत अर्जदाराचे पॅनकार्ड,अर्जदाराच्या जनधन खात्याच्या पासबुकाची पहिल्यापानाची झेरॉक्सप्रत, सिबील रिपोर्ट, अर्जदाराचे रूपे डेबिट कार्ड, मोबाईल नंबर, जातीचा व उत्पनाचा दाखला ( तहसिलदारांचा), दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदार आळखपत्र, ग्रामसेवकांचा रहिवाशी दाखला, आधारकार्ड, कोटेशन, जागेचा पुरावा, व्यवसाया नुसार इतर दाखले, प्रकल्प अहवाल, व्यवसायानुरूप आवश्यकते प्रमाणे इतर दाखले पत्र. उदा. वाहनाकरीता व व्यवसायाकरीता लायसन्स , परमिट , बॅच नंबर व ग्रामीण अर्जदारासाठी ग्रामसेवकांचा दारिद्ररेषेत नाव असल्याचा किंवा नसल्याचा दाखला इत्यादी .
अर्ज सादर करण्यासाठी संबंधित लाभार्थीने येणे गरजेचे आहे. अपूर्ण आणि त्रयस्थ व्यक्तींकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. लाभ घेऊ इच्छिणा-या लाभार्थ्यांनी आपले अर्ज दिनांक 31/07/2017 पर्यत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , सामाजिक न्याय भवन , दुसरा मजला, सात रस्ता सोलापूर येथे जमा करावेत, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उत्तम मोहिते यांनी कळविले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




