👁 8 Views

शेतकऱ्यांना खूषखबर..कर्जमाफीत 2009 नंतरच्या कर्जदारांचा समावेश; नियमित परतफेडीसाठी मुदतवाढ

मुंबई –राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार २००९मध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीनंतर पुन्हा कर्ज घेतलेल्या परंतु ३० जून २०१६पर्यंत ही रक्कम थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांचाही आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ही घोषणा केली.

याशिवाय नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने त्याची मुदत एक महिन्याने वाढवून ३१ जुलै २०१७ पर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पण घेण्यात आला आहे. दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेंतर्गत (ओटीएस) दीड लाखावरील रक्कम भरण्याचा निश्चित कालावधी शासन निर्णयात नमूद नव्हता. त्यांना पैशाची तजवीज करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून अशा शेतकऱ्यांना दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमांतर्गत राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.


तत्पूर्वी, आमदार सर्वश्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. आशिष देशमुख, डॉ. संजय कुटे आणि प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीचे निकष बदलण्याची मागणी केली होती. त्यात प्रामुख्याने २००९नंतरचे जून २०१६ अखेरपर्यंत थकित असलेले कर्ज दीड लाख रुपयांच्या मर्यादेत माफ करणे, कर्जाचे पुनर्गठन केलेल्या मध्यम मुदत दिलेल्या शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी लागू करणे आणि ओटीएस योजनेसाठी कर्जाचे तीन टप्पे शेतकऱ्यांनी भरल्यानंतर शासनाने दीड लाख रुपयांचा शेवटचा टप्पा भरावा, या मागण्यांचा समावेश आहे.
मुंबईतील शेतकऱ्यांची नावे जाहीर करू : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून जाहीर आकडेवारीत कोणतीही गडबड नाही. मुंबईतील कर्जमाफीच्या लाभार्थींच्या यादीत मुंबई व उपनगरातील ८१३ शेतकऱ्यांची संख्या जाहीर झाल्यानंतर शंका उपस्थित करण्यात येत अाहेत. ही नावे जाहीर करू. मात्र काेणत्याही परिस्थितीत बाेगस लाभार्थींना लाभ मिळू देणार नाही.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  












सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *