👁 11 Views

शिवसेना म्हणजे दोन तोंडाचं गांडुळ, अजित पवारांची टीका

भाजप आणि शिवसेनेचा कारभार म्हणजे सगळा सावळागोंधळ असल्याचीही टीका अजित पवारांनी केली आहे.


शिवसेनेची सध्याची अवस्था दोन तोंडाच्या गांडुळासारखी झाली आहे अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याणमध्ये केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेचा संसार करायचा आणि मग त्यांच्यावरच टीका करून वेगळी भूमिका घेतल्याचा आव आणायचा, हे शिवसेनेचं नाटक आहे. अशी टीका अजित पवारांनी केलीये. शिवसेना दोन्ही बाजूने ढोल बडवते आहे. एकीकडे सत्तेची मजा चाखायची आणि दुसरीकडे भाजपविरोधात भूमिका घेऊन आम्ही जनतेसोबत आहोत, शेतकऱ्यांसोबत आहोत असंही भासवायचं, मात्र जनतेला आता हा दुटप्पीपणा लक्षात आला आहे, असाही टोला अजित पवारांनी लगावला आहे.
१५ वर्षांनंतर भाजप आणि शिवसेनेकडे सत्ता आली आहे त्यामुळे ते सत्ता काही सोडणार नाहीत अशीही टीका अजित पवारांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आम्हाला चार महिन्यात सत्ता मिळाली होती. मात्र भाजप आणि शिवसेनेला १५ वर्षांनी सत्ता मिळाली आहे, मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला, मात्र आम्ही खचून जाणार नाही नवी उभारी घेऊ असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. शेतकरी अजूनही नाराज आहेत, कारण सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरीही त्यातला गोंधळ अजूनही संपलेला नाही. मुख्यमंत्री एक बोलतात आणि त्यांचे मंत्री दुसरीच भाषा वापरतात, मंत्र्यांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ताळमेळ असलेला दिसून येत नाहीये अशीही टीका अजित पवारांनी केलीये.
भाजप आणि शिवसेनेचा कारभार म्हणजे सगळा सावळागोंधळ आहे असे म्हणत त्यांनी सध्याच्या कारभाराचीही खिल्ली उडवली आहे. कल्याणमध्ये झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही झापलं आहे. येत्या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा असा सल्ला देतानाच त्यांनी मरगळ झटकून टाकण्याचंही आवाहन केलं आहे.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *