*डॉक्टर्सच्या रिक्त जागा त्वरित भरण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
*शवागर, सीसीटीव्ही, डास प्रतिबंधक जाळी बसविण्यासाठी शासनाचे परिपत्रक ….
*आमदार निलमताई गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश….
पंढरपूर, दि.१२ (प्रतिनिधी) – माणूस मेल्यानंतर त्या मृतदेहाच्या संवेदना संपत असतील पण डॉक्टरांनी सेवा बजावताना आपल्या मधील संवेदना जागृत ठेवून कर्तव्य बजवायला हवे असे खडेबोल राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शासनाच्या सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना सुनावले. पंढरपूरच्या बेवारस मृतदेहाच्या विटंबना प्रकरणी सहवेदना व्यक्त करताना त्यांनी आमच्या खात्याकडून संवेदनहीन काम झाल्याचे मान्य करीत यापूढे अशा घटना घडू नयेत यासाठी अद्यावत शवागराची सोय उपलब्ध करून रुग्णालयात असलेल्या मृतदेहाची सर्वस्वी जबाबदारी ही यापुढे सामान्य रुग्णालयाचीच असेल तसे परीपत्रक शासनाच्या वतीने काढत असल्याची महत्वपूर्ण घोषणा ना. सावंत यांनी केली.
पंढरपूरच्या सामान्य (कॉटेज) रुग्णालयातील बेवारस मृतदेहाची विटंबना आणि एकूणच गैरसुविधा या विषयी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ निलमताई गोऱ्हे यांनी आरोग्यमंत्री डॉ सावंत यांचे लक्ष वेधले होते.
या विषयाच्या अनुषंगाने आज आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडली.
या बैठकीस राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त प्रदीप व्यास, राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक बी डी पवार, उपसंचालक डॉ. संजय देशमुख, सोलापूरचे सिव्हिल सर्जन डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, सोलापूरचे युवा सेनेचे संपर्क प्रमुख अतुल राजूरकर, शिवसेनेचे पंढरपूर शहर प्रमुख संदीप केंदळे आदी उपस्थित होते
एक तास चाललेल्या या बैठकीत पंढरपूरच्या सामान्य रुग्णालयातील समस्यांवर साधकबाधक चर्चा झाली खास करून या रुग्णालयातील डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक पदासह इतर रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या जागा त्वरित भराव्यात असे निर्देश ना. सावंत यांनी दिले.
जागा भरण्याची प्रक्रिया तत्पर व सुलभ व्हावी यासाठी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार मंत्री महोदयांनी विभागीय आरोग्य संचालकांना देऊन टाकले.
बेवारस व वारस असलेले मृतदेह राखून ठेवण्यासाठी अद्यावत शवागराची व्यवस्था उभी करावी खास करून पंढरपूरमध्ये चार मृतदेह ठेवता येतील अशी सोय करा असे सक्त निर्देश ना. सावंत यांनी दिले.
शासनाची सामान्य रुग्णालये ही गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्याची उघडली आहेत तिथे त्यांना विनम्र पूर्वक सेवा मिळायला हवी असा मुद्दा उपस्थित करीत आमदार गोऱ्हे यांनी यांनी पंढरपूरच्या सामान्य रुग्णालयातील असुविधांचा पाढा वाचला.
सोनोग्राफी, एक्स रे, रक्त लघवी तपासणी, प्रसूती, राजीव गांधी जीवनदायी योजना, अतिदक्षता विभाग, स्वच्छता, अपुरा कर्मचारी वर्ग, बंद पडलेली पोलीस चौकी याकडे ना. सावंत यांचे लक्ष वेधले.
पुरेसे तज्ञ डॉक्टर नसल्याने गेल्या काही वर्षात या रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत पन्नास टक्क्यांहून अधिकची घट झाल्याची आमदार गोऱ्हे यांनी आकडेवारी मांडली. या माहितीला डॉ पट्टणशेट्टी यांनी दुजोरा दिला.
या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा होऊन या सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी ना. सावंत यांनी आपल्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
जिल्हा शल्य चिकित्सक श्री पट्टणशेट्टी यांनी सोलापूर मध्ये बसून कामकाज न पाहता आठवड्यातून तीन वेळा पंढरपूरच्या रुग्णांलयास भेट द्यावी पुणे विभागाच्या आरोग्य संचालकांनी महिन्यातून एकदा भेट देऊन सर्व सेवा पुरविल्या जातात की नाही याची शहनिशा करावी अशा सूचना केल्या. बंद असलेली पोलीस चौकी सुरू करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे प्रस्ताव द्या त्याचा पुरावा मी स्वतः करेन असे आश्वासन ना सावंत यांनी दिले.
सी सी टी व्ही साठी परिपत्रक…
डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नाहीत अशा तक्रारी मोठ्यांप्रमाणात येत आहेत याला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयात सी सी टी व्ही व बायोमेट्रिक मशीन बसवा अशा सूचना या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी दिल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी एक परिपत्रक काढा असे निर्देश त्यांनी दिले.
या यंत्रणेमुळे डॉक्टर सेवा बजावण्यासाठी रुग्णालयात हजर आहेत की नाही हे स्पष्ट होईल. आणि रुग्णांच्या तक्रारी कमी होतील.
डासांसाठी परिपत्रक….
रुग्णालयाचा परिसर अस्वच्छ असतो या स्वच्छतेमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना डासांचा त्रास सहन करावा लागतो. या मुद्द्यावर ना. सावंत यांनी राज्यातील सर्व रुग्णालयात डास प्रतिबंधक जाळी खिडक्यांना बसवावी आशा सूचना केल्या तसे परिपत्रक सर्वांना पाठविण्याचे निर्देश ना. सावंत यांनी दिले.
बैठकीचा शेवट करताना आरोग्यमंत्री डॉ सावंत म्हणाले पंढरपूर हे देशातील महत्वाचे आध्यत्मिक पीठ आहे इथे येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना कोणत्याही गैरसुविधाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक प्रयन्त करावेत असे स्पष्ट केले.
बैठकीतील ठळक मुद्दे
शासन तीन परिपत्रक काढणार
@ शवागराची व्यवस्था करा
@ सी सी टी व्ही & बायोमेट्रिक मशीन बसवणे
@ खिडक्यांना जाळ्या लावणे










