शरद पवार राजीनाम्यावर ठाम; उद्या अंतिम निर्णय

Loading

 

Pandharpur live :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी चालविली असली, तरी पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील आमदारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर तसेच ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी त्यांची भेट घेतली. बुधवारी दिवसभर नेते, पदाधिकार्‍यांचे बैठकीचे सत्र सुरू होते. या पेचावर येत्या 5 मे रोजी पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. मात्र, जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता, तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केला असता, असे त्यांनी स्पष्ट करतानाच, 5 मे रोजी अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेली समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे शरद पवार यांनी नेत्यांकडे स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीतील हा सस्पेन्स आणखी दोन दिवस तरी कायम राहणार आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला.


शरद पवार यांनी मंगळवारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर करून राजकीय वर्तुळात हलकल्लोळ उडवून दिला. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी चालविली आहे. त्यासाठी मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आदींनी राजीनामे देत दबाव वाढविला आहे. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

शरद पवार बुधवारी सकाळी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे उपस्थित होते. या ठिकाणी ते जवळपास तीन तास होते. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी प्रमुख नेत्यांनी भेट घेत त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आग्रह धरला. त्याचवेळी बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा जयघोष करत निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते. मात्र, शरद पवार पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर ‘सिल्व्हर ओक’ला परतले. त्यामुळे शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य दुसर्‍या दिवशीही कायम राहिले. त्यावर शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवस जाऊ द्या. कदाचित त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

समितीचा निर्णय पवार मान्य करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीत जो काही निर्णय होईल तो मला मान्य असेल, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे स्पष्ट केले. राजीनामा देण्यापूर्वी मी पक्षातील वरिष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते, असे मला आता जाणवत आहे. परंतु, मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता; तर स्वाभाविकरीत्या तुम्ही सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला, अशी भवनाही त्यांनी नेत्यांकडे व्यक्त केली.

दरम्यान, अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीची बैठक 6 मे रोजी होणार होती. मात्र, शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही बैठक 5 मे रोजी घेण्याचे ठरले. ही समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे पुन्हा एकदा शरद पवार यांनी नेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत सांगितले.

1 मे या तारखेशी वेगळे नाते : पवार

शरद पवार यांनी राजीनामा देण्याचे कारणही नेत्यांना सांगितले. 1 मे 1960 रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे 1 मे सोबत माझे वेगळे नाते आहे. मी युवक काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत भाकरी फिरवण्याचे वक्तव्य केले होते. मी युवकांची मते विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे, त्यासाठी राजीनाम्याचा निर्णय घेतला, असे पवार यांनी सांगितल्याची माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने दिली.

सुप्रिया सुळे यांच्याकडे सूत्रे?

राष्ट्रवादीची राष्ट्रीय धुरा ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे; तर राज्याची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देण्यात येईल, असे बोलले जात आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी ही शक्यता फेटाळून लावली. पटेल म्हणाले, शरद पवार यांनीच अध्यक्ष राहावे, ही आमची भूमिका आहे. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्ही अंदाज बांधू नका. आपण अध्यक्षपदाच्या स्पर्धेतही नाही आणि आपली तशी इच्छाही नाही, असे त्यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनीही सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्ष निवडीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले. आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेत असतो. माध्यमांनी त्याबाबत निर्णय घेऊ नयेत, असे सांगून आव्हाड म्हणाले, शरद पवार यांना बघून आम्ही राजकारणात आलो आणि एवढी वर्षे राजकारण करत आहोत. तेच जर राजकारणात राहणार नसतील, तर आम्ही तरी कशाला राजकारण करायचे, अशी आमची भूमिका आहे. आमच्या भूमिकेचा विचार शरद पवार यांना करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. पवार हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे मायबाप आहेत. ते पक्षातील लाखो कार्यकर्त्यांना असे वार्‍यावर सोडून दूर होणार नाहीत, असे आव्हाड म्हणाले. तसेच पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून आपण पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *