शिरुर: गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील वरुडे रस्त्यालगत घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. मीनाबाई गांगुर्डे (वय 27) असे पत्नीचे नाव आहे. तिचा पती ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय 32) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, तो फरार झाला आहे.
याबाबत ताराचंद मोरे (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरचा 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पत्नी मीनाबाईसोबत वाद झाला होता. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. पहाटे ज्ञानेश्वर घरातून बाहेर गेल्याचे शेजारील व्यक्तींनी पाहिले. मात्र, सकाळी मीनाबाई घरातून बाहेर येत नसल्याने त्यांचा चुलत भाऊ ताराचंद त्यांना आवाज देण्यासाठी गेला असता मीनाबाई मृतावस्थेत असल्याचे त्यांना दिसले. त्यांचा हात व गळा दोरीने बांधलेला होता.
याबाबतची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक अनिल चव्हाण, शिवाजी मुंडे, हवालदार संदीप जगदाळे, विजय सरजिने, सागर सरवदे, पोलीस पाटील श्रीकांत झांजे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानेश्वर याने पत्नी मीनाबाईचे हात बांधून दोरीने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ज्ञानेश्वरवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.