आटपाडी: गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील विवाहिता ऐश्वर्या चंद्रकांत साळुंखे (वय 25) हिने सोमवारी रात्री आठच्या सुमारास धारधार चाकूने स्वत:चा गळा चिरून जीवन संपवले. याबाबत गोमेवाडीचे पोलीस पाटील शामराव दामोदर पाटील (वय 60) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, ऐश्वर्या चंद्रकांत साळूंखे (वय 25, वलवण ता. आटपाडी) ही सध्या गोमेवाडी येथे आई वडिलांच्याकडे राहत होती. दीड वर्षांपूर्वी चंद्रकांत साळूंखे यांच्या सोबत तिचे लग्न झाले होते. त्यांना एक अपत्य आहे. काल तिचा भाऊ व वडील कामानिमित्त आटपाडीला गेले होते. तर आई बाहेरगावी गेली होती.
संक्रातीच्या सणासाठी ती गेल्या काही दिवसांपूर्वी माहेरी गोमेवाडी येथे राहण्यास आली होती. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ऐश्वर्या हिने धारधार चाकूने स्वत:चा गळा चिरून जीवन संपवले. याबाबतची माहीती गोमेवाडीचे पोलीस पाटील शामराव दामोदर पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यास दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विनय बहिर यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक खाडे यांच्यासमवेत पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
यावेळी घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक विनय बहिर, स.पो.नि.रमेश जाधव, विशेद्रसिंग बायस, पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे यांनी भेट देत पाहणी केली.