मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यात खळबळ उडवली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांना भेटून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
फडणवीस यांनी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे कुणी आरोपी असतील, त्यांना सोडले जाणार नाही. महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्यासाठी हे प्रकरण एक उदाहरण ठरेल.” तसेच, त्यांनी निपक्षपाती तपास होईल आणि दोषींना शिक्षा दिली जाईल, असेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, “आमच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत, जे आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले. आम्हाला निपक्षपाती तपास हवा आहे. एफआयआरमधील आरोपींचे कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) तपासले जावेत आणि जे कोणी गुन्ह्यात सामील असतील, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, ही हत्या पवनचक्की खंडणी प्रकरणाशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीस सरकारने न्यायाची ग्वाही दिली आहे. यामुळे पीडित कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास कसा पुढे जातो आणि दोषींना प्रत्यक्षात कोणती शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.