👁 11 Views

माढा लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे… शरद पवार-राजु शेट्टी-महादेव जानकर आमनेसामने…

Pandharpur LIVE 6 March 2019



राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला असतानाच खासदार राजू शेट्टी यांनी सुध्दा हातकणंगलेसोबतच माढयामधूनही निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे. पवार यांच्याविरोधात महादेव जानकर यांनी तर आधीच दंड थोपटले आहेत. त्यामुळे माढा मतदारसंघामध्ये पवार, शेट्टी व जानकर हे तीघे मातब्बर राजकीय नेते आमने-सामने उभे ठाकणार असून माढा लोकसभा निवडणुक ही ‘तिरंगी’ होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
पवार यांनी सन 2009 मध्ये माढा मधून निवडणूक लढविली होती व चांगल्या मताधिक्याने ते निवडूनही आले होते. त्यावेळी भाजपचे सुभाष देशमुख दुस-या क्रमांकावर, तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने लढत दिलेले महादेव जानकर तिस-या क्रमांकावर राहिले होते. जानकर यांना त्यावेळी 98 हजार मते मिळाली होती. कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाचा व नेत्याचा पाठिंबा नसताना महादेव जानकर यांनी पवार यांना जबरदस्त मात दिल्याने ते चर्चेत आले होते. त्यानंतरच्या सन 2014 च्या निवडणुकीत पवार यांनी लोकसभा निवडणुक लढविली नव्हती. त्यामुळे जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात रिंगणात उतरले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या डावपेचांमुळे जानकर यांना त्यावेळी घवघवीत यश मिळाले. सुप्रिया सुळे अवघ्या 50 हजार मतांनी कशाबशा निवडून आल्या होत्या. जानकर यांचा निसटता पराभव झाला. पण त्याचे फळ म्हणून भाजपने त्यांना विधानपरिषदेत आमदार बनवून नंतर मंत्रीपदही देऊ केले.


शरद पवार यांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी जानकर नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करताच जानकर यांनीही तेथून लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. ते महायुतीचे उमेदवार असल्याने पवारांना चांगली टक्कर देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजू शेट्टी माढाच्या मैदानात उतरले तर या दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी व दुध उत्पादकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळेल. शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या वेळी सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीकडून त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील मैदानात होते. पण मोहिते पाटिल अवघ्या 25 हजार मतांनी निवडून आले होते. सदाभाऊंना मिळालेली मते जर शेट्टी यांना मिळाली तर ते सुद्धा पवार यांना चांगली टक्कर देतील.

जर पवार, जानकर व शेट्टी हे तिघेही मैदानात उतरले तर माढाची लढत राज्यात लक्षणीय ठरेल असे बोलले जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *