मयत शुभम चंद्रकांत पवार
अवैध वाळु उपशामुळे नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एका भाविकाचा चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्यु झाल्याच्या घटनेला आठवडाही उलटला नाही तोपर्यंत अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्ड्याने आणखी एकाचा बळी घेतला आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार काल रविवार दि. 7 एप्रिल 2019 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शिरढोण गावाजवळील वॉटर हाऊस पंपाजवळ नदी पात्रात ही घटना घडली. शुभम चंद्रकांत पवार (वय-21), रा.वाल्मिकी नगर, इसबावी, ता.पंढरपूर) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
शिरढोण वॉटर हाऊस जवळील नदीपात्रात वाळु उपसा मोठ्या प्रमाणात झाला आहे. नुकतेच नदीला पाणी सोडण्यात आले आहे. शुभम याठिकाणी आपल्या मित्रांसोबत नदीमध्ये पोहण्यासाठी गेला असताना नदी पात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे शुभमचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात अवैधरित्या वाळु उपसा करणार्यांनी उच्छाद मांडला असुन यांच्यावर कोणताच अंकुश उरलेला आढळत नाही. अवैध वाळु उपशामुुळे चंद्रभागा नदीचे अस्त्वि मात्र नक्कीच धोक्यात आले आहे. अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात बुडून आणखी कितीजणांना आपले प्राण गमवावे लागणार? अवैध वाळु उपसा केंव्हा थांबणार? हे प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहेत.

