पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीमध्ये संपुर्ण देशापेक्षा महाराष्ट्राकडे अधिक लक्ष घातले असून महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राकडे तर अधिकातील अधिक लक्ष घातल्याचे चित्र सध्या स्पष्ट होताना आढळत आहे. शुक्रवारी (12 एप्रिल) रोजी नगरमध्ये मोदींची सभा होणार असुन त्यानंतर पाचच दिवसांत ते पुण्यात दाखल होणार आहेत. 16 एप्रिलच्या पुणे मुक्कामानंतर मोदी यांची अकलुज येथे सभा होणार आहे.
येत्या 16 एप्रिल रोजी नरेंद्र मोदींचा मुक्काम पुण्यात आहे. यावेळी मोदी पश्चिम महाराष्ट्रातील कांही प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असुन पश्चिम महाराष्ट्रातील 12 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याचे समजते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कांही नेत्यांच्या भाजपा प्रवेशानंतर पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्याच वळवर येवुन ठेपले असुन मोदींच्या पुणे येथील निमंत्रीत राजकीय नेत्यांसोबत होणार्या चर्चेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये आमुलाग्र असे बदल होणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांमधुन व्यक्त होत आहे. पुण्यातील मुक्कामानंतर दुसर्याच दिवशी म्हणजे 17 एप्रिल रोजी अकलुज येथे मोदींची सभा होणार असुन या सभेमध्ये ते काय बोलतील याची उत्सुकता भाजपासह विरोधी पक्षातील दिग्गजांनाही लागुन राहीली आहे.
मोदींच्या पुणे मुक्कामाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, विशेष सुरक्षा यंत्रणाही येत्या दोन दिवसांत पुण्यात दाखल होणार आहे. मोदी पुणे विमानतळ ते राजभवन तसेच राजभवन ते पुणे विमानतळ असा प्रवास करणार आहेत. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास राजभवन येथून मोदी पुणे विमानतळावर जातील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने अकलूजला प्रचाराला जातील.
ही सभा आटोपून ते हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावर दाखल होतील. तेथून ते विमानाने राजकोट येथे पुढील प्रचार सभेसाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदी यांची पुण्यात सभा व्हावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, पुण्याच्या जवळ बारामती लोकसभा मतदारसंघात मोदी यांची सभा घेण्याचा वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. मोदी यांच्या पुणे दौर्यामुळे शहरात भाजपला फायदा होणार असल्याचा दावा भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.


