👁 7 Views

पुणे – सोलापूर महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात

 

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) पहाटे पाचच्या सुमारास घडली. विकास सुरेंद्र (वय-३५, रा. रायपुर, छत्तीसगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. अपघातात दोन कंटेनर व एक चारचाकी अशा तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


पुणे – सोलापूर महामार्गावर एलाईट चौक व तळवडी चौक या दोन्ही चौकांच्या मध्ये एका कंटेनरचा बिघाड झाल्याने मध्यरात्री थांबला होता. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास विकास सुरेंद्र हा कंटेनर घेऊन पुण्याच्या बाजूने निघाला असताना अचानकपणे महामार्गावर थांबलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. 


हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. या धडकेत कंटेनर दुभाजकावरून सोलापूरच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर आला व सोलापूरच्या दिशेने उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीला जाऊन धडकला. यामध्ये चारचाकी गाडीचे व कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 यामध्ये कंटेनरचा चालक विकास सुरेंद्र हा निपचित पडल्याचे दिसून आले. कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून विकासला उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


दरम्यान, पाच मिनिटाच्या अंतरावर लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्र असूनही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी अपघात स्थळी न आल्याने तब्बल अर्धा तास या अपघात ग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्तांना पोलिसांकडून तत्काळ मदत मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *