कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर चे कार्यकारी संचालक आणि माझे परम मित्र डॉ. सुनील दादा पाटील यांनी सौ. संजीवनी सुनील पाटील द्वारा संकलित ‘प्रेरणादायी विचार’ हा सुविचारांचा संग्रह प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्या हाती देवून गेले. सर्व सुविचारांचे मी प्रथम वाचन केले. विविध विषयावरील सुविचारांचे संकलन करण्याचा अनोखा छंद या संग्रहाच्या रूपाने कळून आला. तो वाचता – वाचता हाती अमुल्य ठेवा गवसल्याची जाणीव झाली.
कोणत्याही साहित्याचे वाचन करतांना त्यामध्ये मनाला भोवणारी अनेक वाक्ये Thoughtsसापडतात; ती वाचल्यानंतर विसरता येत नाहीत. त्या वाक्यांचा मनावर सखोल परिणाम होतो. ही वाक्ये थोर संतांची असो अथवा साहित्यिकांची, पण त्यातील ‘प्रेरणादायी विचार’ हे जीवनाला स्पर्शून जाणारे, मनाला बळकटी देणारे असतात.
ह्या विचारांमध्ये जीवाला उन्नत बनवून त्यामध्ये परिवर्तन घडवण्याची टाकद असते. ‘प्रेरणादायी विचार’ अंधारलेल्या
मनाला प्रकाशाची दिशा दाखवण्याचे काम करतात.मानवी मनाला सुखाचे क्षण देणारे, दु:खातून जिद्दीने जीवन जगण्याची उमेद निर्माण करण्याची टाकद प्रेरणादायी विचारातून व्यक्त होते, हा विविध विषयावरील शेकडो विचारांचा संग्रह म्हणजे मौल्यवान ठेवाच आहे. सौ. संजीवनी पाटील यांनी संकलित केलेले विविध विषयावरील सुविचार अनेक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींचे असून त्याची मांडणीसुद्धा मराठी वर्णाक्षरानुसार केलेली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या संकटातून वाचवण्याचे व यशस्वी करण्याचे सामर्थ्य सुविचारात आहे. याची आम्हाला दैनंदिन व्यवहारातून प्रचिती येते. एक सुविचार वाचला तर पुढील सुविचार वाचावा अशी
उत्कंठा वाढवणारे व लहानांपासून वृद्धांच्यापर्यंत सर्वांनाच ‘प्रेरणादायी विचार’ हे पुस्तक आवडेल याचा मला विश्वास आहे.
प्रत्येक क्षण आपण कसा जगू शकतो आणि त्यातून कोणता अनुभव घेवू शकतो या बाबत वाचकांना मार्गदर्शन करणारे ‘प्रेरणादायी विचार’ संकलकाने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या आनंदासाठी संकलित केलेले आहेत. जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घेवून त्याला सुंदरता व सौंदर्यभावना वाढीस लावणारा हा आगळा वेगळा संग्रह आहे. या संग्रहातील अनेक प्रेरणादायी विचार वाचकांच्या मनात रुजतील व त्यांना स्वतंत्रपणे विचार करावयास भाग पाडतील आणि त्यातूनच त्यांना आपल्या अंतर्मनाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळेल. सुविचार वाचनाबरोबर त्याचे चिंतन केले पाहिजे, त्यामुळे आचार विचारात बदल होतो आणि जीवनाची फुलणारी वाटसुद्धा त्यातून सापडू शकते असे मला वाटते.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटे टाळता येणं शक्य नाही, पण… दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते. कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणा-या प्रत्येकाने हे सुविचार वाचायला हवेत… नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवेत…! आपल्या प्रापंचिक जीवनातून वेळ काढून वेचक सुविचार संग्रहित करून ते पुस्तक रूपाने वाचकांच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल सौ. संजीवनी पाटील यांचे अभिनंदन! भावी काळात आपल्या संग्रहातून, लेखनातून पुढील कार्य यशस्वीपणे घडावे यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
‘प्रेरणादायी विचार’ या विचार करायला लावणा-या पुस्तकाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली; या वरूनच हे पुस्तक
वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरले असल्याचा आनंद संकलकाला मिळाला आहे. पुस्तक किती लहान आहे यापेक्षा त्यातील विचार माणसाच्या जीवनाला चांगली उभारी देत असेल तर नक्कीच त्याला सुज्ञ वाचकवर्ग उपलब्ध होतो याची प्रचीती तीस-या आवृत्तीच्या निमित्ताने आली आहे. समाजातील सर्व थरातील वाचकांनी आपल्या संग्रही ठेवण्यासारखे हे पुस्तक आहे.
‘प्रेरणादायी विचार’ ह्या पुस्तकातील एक तरी विचार तुमचे आयुष्य घडवेल. सकारात्मक विचारातून पूर्णत्वाकडे नेणारे हे पुस्तक स्वतःसाठी घ्या आणि आपल्या मित्र मैत्रिणींना भेट द्या. वेगवेगळे कार्यक्रम, समारंभ, बक्षिसे, वाढदिवस, भेट वस्तू आणि विशेष दिनानिमित्त कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला “बुके नव्हे बुक द्या”. ‘प्रेरणादायी विचार’ या आगळ्या वेगळ्या पुस्तकाच्या तिस-या आवृत्ती प्रकाशनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! तसेच प्रकाशक व संकलक यांचे पुनश्चः अभिनंदन!
– नंदकुमार शंकरराव गायकवाड
पुस्तकाचे नाव …
प्रेरणादायी विचार संकलक सौ. संजीवनी सुनील पाटील
आवृत्ती तिसरी ISBN 978-81-926535-6-3
प्रकाशक डॉ. सुनील पाटील प्रकाशन कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
पृष्ठे 52 (कव्हर सह) आकार 1/8
मुल्य 60/- विषय प्रेरणादायी विचारांचासंग्रह
वर्गवारी शैक्षणिक संपर्क 02322 – 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com

