शिवरायांच्या युद्धनीतीचे वेगळेपण


>     मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची मूहुर्तमेढ रोवणार्‍या शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे वेगळेपण हे त्यांच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणता येईल. आई जगदंबेचे आशीर्वाद अन् ‘पोशिद्यां’च्या रक्षणासाठी स्वत:चे प्राणार्पण करण्यास सिद्ध असलेले सैन्य फारच अल्प राजांना मिळाले असतील. संख्या आणि शस्त्रबळाने अल्प असतांनाही केवळ युक्तीच्या बळावर बलाढ्य अशा पातशहांना नमवणार्‍या शिवरायांच्या युद्धनीतीची काही वैशिष्ट्ये इतिहाससंशोधक श्री. निनाद बेडेकर यांच्या लेखातून संकलित केली आहेत. 
> १. अकस्मात आक्रमण 
>     अकस्मात आक्रमण (हल्ले) हा शिवाजीराजांच्या डावपेचांचा गाभाच होता. शाहिस्तेखानावरील विस्मयकारक छापा हा त्या आक्रमणातील कळसच होता. शिवाजीराजांच्या या आक्रमणानंतर ३ वर्षे पुण्यात असलेला खान आपली १ लक्षाची फौज घेऊन अवघ्या ३ दिवसांत गाशा गुंडाळून औरंगाबादला चालता झाला.
> २. गनिमी कावा 
>     शिवाजीराजांनी या प्रदेशात लढण्यासाठी आपली एक खास शैली शोधून काढली. यालाच ‘गनिमी कावा’ म्हणतात. ही शिवरायांची स्वराज्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे. ही कूटयुद्ध किंवा वृकयुद्ध पद्धतीवर आधारलेली होती. ‘गनीम’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘लुटारू’ असा आहे. लुटारू जसे अकस्मात येतात आणि लूट घेऊन क्षणार्धात पळून जातात, तसेच शिवाजीराजेही करत असत. डेनिस किन्केडने म्हणूनच ‘द ग्रँड रिबेल’ असे म्हटले. 
> अ. गनिमी काव्याची तत्त्वेे : अकस्मात छापा, तोही आपल्याला सोयीस्कर अशा जागेवर, स्वत:ची न्यूनतम (कमीतकमी) हानी आणि हातात अधिकाधिक लूट किंवा प्रतिपक्षाची साधेल तेवढी अधिक हानी, ही या गनिमी काव्याची तत्त्वेे होती. हे तंत्र जरी शिवाजीराजांनी जोपासले आणि मोठ्या प्रमाणावर वापरले, तरी त्यांचे प्रवर्तक शहाजीराजे होते.
> ३. मराठी अकलेचा एक अस्सल नमुना !
> अ. बहादूरखानाला फसवले ! : मराठी अकलेचा एक अस्सल नमुना महाराजांनी आलमगीराच्या दख्खनच्या सुभेदारास दाखवला. पुण्यापासून २४ कोसांवर भीमेच्या काठी, बादशहाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश जफरजंग हा किल्ला बांधून रहात होता. त्याच्यापाशी बादशहाला भेट (नजर) करण्यासाठी म्हणून आणलेले २०० अरबी घोडे आणि १ कोटी रुपयांचा खजिना असल्याची बातमी महाराजांना मिळाली. हेरांनी आपले काम व्यवस्थित पूर्ण केले. आता डावपेच, लढाई आणि लूट असा कार्यभाग राहिला होता. महाराजांनी डावपेच आखले. नऊ सहस्रांची फौज घेऊन महाराजांचा सेनाधुरंधर पेडगावच्या दिशेने निघाला. याचे नाव अज्ञात आहे; पण बहुधा हंबीरराव मोहिते असावा. याने फारच गंमत उडवून दिली. आपल्या फौजेच्या २ टोळ्या केल्या. २ सहस्रांची एक टोळी बहादूरगडावर धावून गेली. काय करावयाचे हे आधीच ठरलेले होते. मराठी फौज छावणीवर चालून येत आहे, असे समजताच बहादूरखानने आपल्या फौजेला सिद्ध होण्याचा हुकूम सोडला. जय्यत तयार झालेली मुघल फौज किल्ल्याबाहेर येऊन मराठ्यांच्या दिशेने निघाली. मुघल फौज येत आहे, हे पाहिल्यावर मराठी तुकडी पळत सुटली. हुलकावण्या मारीत त्या मराठी फौजेने मुघल फौजेला फार दूर नेले. बहादूरखान चिडून मराठी फौजेचा पाठलाग करत राहिला. खान फार दूरवर गेला आहे, याची बातमी हेरांनी आणल्यावर ७ सहस्रांची दुसरी मराठी टोळी बहादूरगडावर चालून आली. तेथे असलेल्या मूठभर मुघलांना ही धडक सोसवलीच नाही. पाचोळा कोठल्या कोठे उडाला आणि मराठ्यांनी मुघली छावणीची मोठी लूट केली. एक कोटीचा खजिना आणि २०० अरबी घोडे अलगद हाती आले. एवढी मिळकत (कमाई) झाल्यावर मराठ्यांनी मुघली छावणी पेटवून दिली. पेडगावची छावणी कापरासारखी जळून खाक झाली. सर्व लूट घेऊन मराठे पसार झाले. शिवाजीराजांचा राज्याभिषेकाचा पूर्ण खर्च भरून निघाला.
>
> आ. इंग्रजी दर्यावदींना आश्‍चर्यकारकरीत्या फसवणार्‍या छोट्या चपळ मराठी बोटी ! : ख्रिस्ताब्द (इ.स.) १६८९ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस शिवाजीराजांनी मायनाक भंडारी याला अलिबाग नजीकच्या खांदेरी या बेटावर पाठवले. समुद्र उसळलेला असतांनाच मायनाकने खांदेरीवर किल्ला बांधावयास प्रारंभ केला. खांदेरी आणि उंदेरी ही बेटे अष्टगरातील थळ समोर समुद्रात आहेत. मुंबईच्या इंग्रजांनी कॅप्टन विल्यम मिनचिन याला हंटर आणि रिव्हेंज या दोन मोठ्या बोटी अन् गुराबा देऊन मायनाकला हाकलून देण्यास पाठवले. थळ येथील बंदरातून मराठी छोट्या बोटी रसद, सामानसुमान घेऊन बेटावर जात असत. हे साहाय्य बंद पाडण्याचे काम कॅप्टन मिनचिनला दिले होते. कॅ. अडर्टन, रिचर्ड केग्विन, फ्रान्सिस थॉर्प, वेल्श, ब्रॅडबरी असे नामांकित दर्यावर्दी कॅ. मिनचिनच्या सोबत होते; पण किनार्‍याकडून समुद्राकडे वहाणारा वारा, भरती-ओहोटीचे कोष्टक, थळपासून खांदेरीपर्यंतचा उथळ किनारा या सगळ्यांची बित्तंबातमी इंग्रजांपेक्षा मराठ्यांना अधिक होती. मोठ्या शिडांच्या इंग्रज बोटी वार्‍यामुळे खडकावर आदळण्याची शक्यता असल्याने मोठ्या बोटींची उपयुक्तता न्यून झाली होती. छोट्या चपळ बोटी मात्र रसद घेऊन रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन बेटावर जात असत. त्या सकाळीच कॅ. िर्ंिमनचिनला दिसत. त्याने मुंबईला पाठवलेल्या एका पत्रात लिहिले आहे, ‘या छोट्या चपळ मराठी बोटी आम्हाला आश्‍चर्यकारकरीत्या फसवतात. अशा बोटी इंग्रज आरमारात हव्यात.’ काय वाक्य आहे हे ! ‘ब्रिटानिया रुल्स द वेव्हज’ म्हणणारे इंग्रजी दर्यावर्दी असे म्हणतात, यातच मराठी सागरीसेनेचा विजय आहे. पुढे याच खांदेरीच्या परिसरात मराठी आरमाराचा प्रमुख दौलतखान याने अकस्मात आक्रमण करून ‘डव्ह’ नावाची एक गुराब पकडली आणि त्यावरील इंग्रजांना सागरगडावर डांबले. या सर्व लढाईत इंग्रजांची मोठी हानी झाली.
>
> इ. आग्र्‍याच्या कैदेत असलेल्या शिवाजीराजांना घाबरणारा औरंगजेब ! : शिवाजीराजे आग्र्‍याच्या कैदेत असतांना त्यांच्या भीतीने औरंगजेब आग्र्‍याच्या किल्ल्यातून समोरच असलेल्या जामा मशिदीत नमाज पढावयास जातांना इतका प्रचंड आरक्षक व्यवस्था (बंदोबस्त) ठेवतो, याचे त्या वेळी सर्वांनाच आश्‍चर्य वाटले होते; पण शिवाजीराजांच्या भीतीपोटी तो असे करत असे, याचा उल्लेख राजस्तानी पत्रात आहे.
>
> ई. अजिंक्य लढवय्या, सुष्टांचा मित्र आणि धर्माचा पुरस्कर्ता : ‘शिवाजी महाराज हे अद्वितीय सेनानी होते. सिंधु नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करावयाची त्यांची मनीषा होती, असे तत्कालीन फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरेने लिहिले आहे. शिवाजी हे अजिंक्य लढवय्ये होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. तेे सुष्टांचे मित्र आणि धर्माचा पुरस्कर्ता होते’, असे बर्नियर म्हणतो.
>
> उ. शिवाजी महाराजांचे युद्धनेतृत्व, हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य असणे : रॉबर्ट आर्म याने म्हटले आहे, ‘उत्तम सेनापतीला आवश्यक असणारे सर्व गुण शिवाजी राजांमध्ये होते. शत्रूसंबंधी बातम्या मिळवण्यात त्यांनी कोणतीही कसूर केली नाही. मोठी रक्कम ते यासाठी खर्च करत असत. कोणत्याही मोठ्या संकटाचा त्यांनी धैर्याने आणि युक्तीने सामना दिला. त्या काळातील सेनानींत ते सर्वश्रेष्ठ होते. हातात तलवार घेऊन आक्रमण करणारे शिवाजीराजे, ही त्यांच्या सैन्याची प्रेरणा होती. त्यांचे युद्धनेतृत्व, हे त्यांच्या सैन्याचे चैतन्य होते. 
>
> संकलक : श्री. पराग गोखले
संपर्क क्र. : ८९८३३३५५१७

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *