पंढरीची स्वच्छता करण्यास सरसावल्या विविध सामाजिक संघटना

पंढरपूर (भगवान वानखेडे):- आषाढी यात्रेनंतर पंढरपूर शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या आजच्या दि. 17 जुलै च्या अंकामध्ये ‘आषाढी वारी अन् समस्या’ सदरामधील 9 व्या भागात शहरातील अस्वच्छतेबाबत व पाऊस पडण्यापूर्वीच शहराची स्वच्छता होणे अवश्यक असल्याबाबतचे वृत्त ठळकपणे प्रसिध्द केले होते. परिणामस्वरुप नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जाणार्‍या शहराच्या स्वच्छतेची वाट न पहाता विविध सामाजिक संघटनांनी आज शहरात प्रभावीपणे स्वच्छता मोहिम राबवित शहरातील विविध भागाची स्वच्छता केली. श्रीगुरुदेव सेवा मंडळ, पंढरपूर चंद्रभागा स्वच्छता अभियान, ग्रामगीता तत्वज्ञान सक्रीय दर्शन मंदिर तसेच आर्ट ऑफ लिव्हींग आदी सेवाभावी संघटनांनी यामध्ये सक्रीय सहभाग नोंदविला.

या स्वच्छता अभियानात आर्ट ऑफ लिव्हींगकडून 700 स्वयंसेवकांनी मिळून एकुण  8  टीम बनविल्या होत्या या 8 टीमच्या स्वयंसेवकांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातील स्वच्छता केली. या 700 स्वयंसेवकांमध्ये शहरातील कांही व बाहेरगावाहून आलेल्या काहींचा समावेश होता. चंद्रभागा स्वच्छता अभियान हे आपल्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रात वर्षभर व यात्राकालावधीत स्वच्छतेचे कार्य करीत असते.

आषाढी यात्रेनंतर शहराच्या स्वच्छतेचे काम वरील संघटनांनी केले असले तरी शहरातील विविध भागातील कचरा कुंड्या तुडूंब भरलेल्या आहेत त्या मोकळ्या करणेचे कार्य  तरी पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळ करणे आवश्यक आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *