👁 2 Views

पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या बाजारपेठेतील दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 27 ऑगस्ट च्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवी पेठ या मुख्य बाजारपेठेतील जवळपास आठ दुकाने फोडल्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. पंढरपूर येथील आठ दुकानात सुरक्षिततेसाठी असलेल्या सीसीटीव्हीच्या यंत्रणेला ठेंगा दाखवत लाखो रुपयांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. यामध्ये दोन मोबाईल शॉपमधील अंदाजे सात लाख रुपयांचा मालाची चोरी झाली आहे. ही घटना नवीपेठ परिसरात रविवारी पहाटे दिड ते चारच्या सुमारास घडली आहे.

पंढरपूर शहरातील नवीपेठ परिसरात भाजी मंडई याठिकाणी शहरासह तालुक्यातील नागरीक खरेदीसाठी येतात. यामुळे या परिसरात नागरीकांची वर्दळ असल्याने किराणा दुकाने, मोबाईल अन्य विविध वस्तुची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यातील अनेक व्यापारी दुकाने बंद करुन रात्री आपल्या घरी जातात. यामुळे या परिसरात रात्री शुकशुकाट असतो. याचा फायदा घेत अज्ञात चोरटांनी रविवारी पहाटे दिड ते साडे तीन या कालावधीत आठ दुकानात चोरी केली आहे. किरणा दुकान, कपड्याचे दुकान व मोबाईल दुकान सह छोट्या दुकानात चोरी झाली आहे. मोबाईल शॉपीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. तर किराणा दुकानातील सुट्टे पैसे पळविले आहे.

शिवम मोबाईल शॉपी मधील टि.व्ही. कॅमेरा दुसर्‍या बाजुला सरकविण्याचा प्रयत्न चोरांनी केला. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. यामुळे सीसी टीव्ही. कॅमेर्‍यामध्ये सर्व प्रकाराचे चित्रीकरण झाले आहे. मात्र चोरी करत असताना दोन चोरटयांनी आपल्या चेहर्‍याला कापड बांधले होते. यामुळे सीसी टिव्ही कॅमेर्‍यामध्ये चोरांचे चेहरे कैद झाले नाहीत.

सकाळी चोरी झाल्याचे समजताच दुकान मालकाने पोलीसांना कळविले. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच या सर्व ठिकाणांची पाहणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी केली. डॉग स्कॉड पथकाकडून तपासणी करण्यात आली असून लवकरात लवकर या चोरीचा तपास लाऊन चोरट्यांना गजाआड करु अशी माहिती पोलिस निरीक्षक दबडे यांनी दिली आहे. तसेच ज्यांची दुकाने फोडली आहेत अशा सर्व व्यापार्‍यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करुन आपल्या चोरीस गेलेल्या मालाची माहिती द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *