पंढरपूर (भगवान वानखेडे):- नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभारायची आकांक्षा असणार्या इच्छूक उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली असून मुंबई येथे झालेल्या पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये हे पद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी जाहीर झाले आहे. या सोडतीमुळे पंढरपूर शहरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नगराध्यक्षपदाची निवडणुक लढवायचा मनसुबा आखणार्या अनेकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. पंढरपूर नगराध्यक्षपदाची निवडणुक ही कोणाही महिला व पुरुषांना लढवता येणार असल्याने अर्थातच यासाठीच्या उमेदवारांची संख्या जास्त असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु कांही राजकीय विश्लेषकांच्यामध्ये मिनी विधानसभा असणार्या या नगराध्यक्षपदासाठी कोट्यावधींची उलाढाल केली जाईल. सर्वच बाजुंनी दोन प्रबळ उमेदवार आमनेसामने असतील. इतर कांही उमेदवार हे मतांच्या बेरीज वजाबाकीसाठीचे मोहरे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
येत्या डिसेंबर महिन्यामध्ये पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार असून नगरपरिषदेच्या वार्ड रचनेची सोडत मागील कांही महिन्यापूर्वीच जाहीर झाल्याने नगरसेवक म्हणून निवडणुक रिंगणात उभे रहाणार्याची इच्छा बाळगुन असणार्या अनेकांची लगबग सुरु झालेली होती. पण नगराध्यक्ष जनतेतून निवडून द्यायचा असल्याने सेना-भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षांच्या पदाधिकार्यांसह विविध राजकीय नेत्यांच्या आघाडीतील आजी, माजी नगरसेवक व नवख्या इच्छूकांनाही नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीचे वेध लागलेले होते. अखेर यांची प्रतीक्षा संपली असून सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी हे पद घोषीत झाल्यामुळे इच्छूक असणार्या सर्वांच्याच आनंदाला उधाण आलेले आहे.
जनतेतून नगराध्यक्षपद निवडून येणार असल्याने निवडणुक लढविणार्या विविध राजकीय पक्ष व स्थानिक आघाड्यातील नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये नगराध्यक्षपद हे वजनदार पद असल्याची भावना झालेली आढळून येत आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविण्यासाठी मातब्बर आजी-माजी मेंबर्स यांच्यासह अनेक नवख्यांमध्येही खुप मोठी चुरस निर्माण झाली आहे. आज राज्याच्या मुख्यमत्र्यांनी आणि निवडणुक आयोगांनी राज्याती़ल सर्व नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना आमंत्रीत करून नगराध्यक्षपदाची सोडत घेण्यात आली. यामध्ये पंढरपूर नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी घोषीत झाले.
पंढरपूर नगरपालिका ही सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असून 34 वार्ड असणार्या या नगरपालिकेच्या जनतेतून निवडल्या जाणार्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला ‘मिनी विधानसभा’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले आहे. पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे विविध राजकीय नेत्यांना या शहराच्या नगरपालिकेची सत्ता आपल्या पक्षाकडे हवी आहे. यावेळी जनतेतून नगराध्यक्षपद निवडून दिले जाणार असल्याने यावेळची पंढरपूर नगरपरिषदेची निवडणुक सर्वच दृष्टीने आगळी-वेगळी व रंगतदारहोणार यात शंका नाही.

