जम्मु काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना पंढरीतील मेजर कुणाल गोसावी शहीद.. पंढरपूर शहर बुडाले शोकसागरात

पंढरपूरः- जम्मू काश्मीर मधील नगरोटा सांबा सेक्टर येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांशी लढताना आज पहाटे साडे पाच वाजता पंढरपूरचे वीर सुपूत्र मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी हे शहीद  झाले आहेत. ही बातमी समजताच पंढरपूर शहर शोकसागरात बुडाले आहे. जम्मूजवळ नग्रोटा इथं दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर पहाटे 5.30 च्या सुमारास ग्रेनेडने हल्ला चढवला आणि गोळीबारही केला. 
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवान टिपून मारत आहेत. मात्र पोलिसांच्या वेशात शिरलेल्या काही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले.
कुणाल हे पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मुन्नागिर गोसावी यांचे सुपूत्र होत. अत्यंत उमद्या स्वभावाचे व मनमिळावू असणारे कुणाल गोसावी यांचा पंढरीत मोठा मित्रपरिवार आहे.  दहशतवाद्यांशी लढताना धारातिर्थी पडलेले कुणाल गोसावी हे फक्त २८  वर्षाचे होते. चार वर्षापूर्वी ते सैन्यात दाखल  झाले होते. सहा महिन्यापूर्वीच त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीर येथे झाली होती. तीन दिवसांपूर्वी सुटीवरून ते पुन्हा कामावर परतले होते. २८ वर्षीय मेजर कुणाल गोसावी यांच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन भाऊ आहेत. चार वर्षांपूर्वी ते सैन्यात दाखल झाले होते. मंगळवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे दोन वीर शहीद झाले आहेत. नांदेडमधील लोहा तालुक्यातील जानापुरी येथील संभाजी कदम यांनाही वीरमरण आले. 
मेजर  कुणाल शहीद झाल्याची बातमी कळताच पंढरीत सर्वत्र शोककळा पसरली. सोशल मिडीयावर  शोकसंदेश  फिरू लागले आहेत. पंढरीच्या या वीर जवानाला भावपुर्ण आदरांजली. पंढरीचे सुपुत्र मेजर कुणाल गोसावी हे काश्मीर मध्ये शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या कुटुंबियांना फोनवरून समजले. 
जवानांच्या प्रत्युत्तरात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याची माहिती आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *