सोलापूर, – सोलापूर व उस्मानाबाद आरटीओ कार्यालयाची फसवणूक करून महसूल बुडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाल यांना अटक करण्यास उस्मानाबाद पोलिसांनी टाळाटाळ सुरू केली आहे.
मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाल यांनी उस्मानाबाद आरटीओ कार्यालयात नियुक्तीस असताना उस्मानाबादसह सोोलापूर व इतर जिल्ह्यांतील वाहने बेकायदा पासिंग करून शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडविल्याचे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणी शेजवाल यांच्याविरूद्ध उस्मानाबाद व बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हे प्रकरण तपासासाठी उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्याचबरोबर परिवहन कार्यालयाने शेजवाल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
या प्रकरणात अटक होईल या भीतीपोटी शेजवाल यांनी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्याानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यावर २८ आॅक्टोबर रोजी त्यांनी अॅड. जयंत भूषण, अॅड़ यतीन जगताप, अॅड. श्रीकांत देशमुख, अॅड. रॉबीन मजुमदार यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्या. ए. के. सिक्री, न्या. एन. व्ही. रामन्ना यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. दीड वर्षाचे मुल असल्याने या प्रकरणात जामीन मिळावा, अशी त्यांनी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश योग्य असल्याचे मत व्यक्त करून अर्जदाराने जिल्हा न्यायालयासमोर हजर राहून रेग्युलर जामिनाची मागणी करणे उचित होईल, असे नमूद करून अर्ज निकालीत काढला. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर मोटार वाहन निरीक्षक शेजवाल यांना खालच्या कोर्टासमोर हजर राहणे गरजेचे असताना पोलिसांना गुंगारा देऊन त्या सोलापुरात वावरत असल्याची चर्चा आहे. उस्मानाबाद पोलिसांनी फक्त विजापूरर नाका पोलिसांकडे विचारणा करून त्यांना अटक करण्याचे टाळले आहे.
