पंढरपूर लाईव्ह, 24 एप्रिल 2017
संग्रहीत व्हिडीओ
पंढरपूर शहर व परिसरामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेची वाहने वगळता सर्व प्रकारची जड व अवजड वाहने कायमस्वरूपी बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी , सोलापूर यांनी जा.क्र. 2016 / डिसीबी / 2 / आर आर / 806 दिनांक 4 /2 /2016 अन्वये आदेश दिलेले होते . त्यानंतर कराड – पुणे लिंकरोडवरची जड व अवजड वाहतूक पुनश्च सुरू करणेबाबत आजअखेर कोणत्याही प्रकारचे आदेश झालेले नाहीत, याबाबतची माहिती अधिकारात प्रथम अपिलानंतर पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी आपणास दिलेली आहे. परंतु लिंकरोडवर सर्रासपणे जड-अवजड वाहतुक सुरु असल्याचे चित्र नागरिकांना पहावयास मिळत आहे. ही वाहतुक त्वरीत थांबवावी अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशन, पंढरपूरचे अध्यक्ष यशवंत डोंबाळी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे केली आहे.
या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सदर आदेशानंतर फक्त सहा महिनेच लिंकरोडवरची जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद होती. त्यानंतर लिंकरोडवर पुनश्च जड व अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक बेफामपणे वाहतूक पोलिसांच्या समक्षच सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवीतास पुनश्च धोका निर्माण झालेला आहे. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आदेशाचा अवमान करून पंढरपूर परिसरात जड व अवजड वाहने पाठविणार्या पोलीस ठाण्यावर व पोलीस अधिकार्यांवर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी त्वरीत कारवाई करून पंढरपूर परिसरातील जड व अवजड वाहनांची वाहतूक त्वरीत बंद करावी अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशन, अअय पंढरपूरचे अध्यक्ष यशवंत डोंबाळी यांनी केली आहे.
