शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
संघटनाबांधणीला शेती पाहणीचा मुलामा
शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी शिवसेनेचे मंत्रिमंडळातील सदस्य व आमदार ६ व ७ मे रोजी औरंगाबाद येथे येणार आहेत. ते दोन दिवसांत ४६ तालुक्यांचा दौरा करणार आहेत. शिवसंपर्क अभियान असे या दौऱ्याला नाव देण्यात आले आहे. मराठवाडय़ात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना घसरणीला लागली आहे. या निमित्ताने राजकीय बांधणीचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. ७ मे रोजी उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदारांची संपर्क बैठकही घेणार आहेत.
शेती समस्यांची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते मराठवाडय़ात दरवर्षी येतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यामागे मुलींच्या लग्नाचा न झेपणारा खर्च असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेकडून सामूहिक विवाह सोहळय़ांचे आयोजनही मोठय़ा प्रमाणात करण्यात आले होते. काही जिल्हय़ात शिवजलक्रांती योजनाही सुरू करण्यात आली होती. मात्र, मराठवाडय़ात नेमलेल्या पालकमंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. स्थानिक पदाधिकारी व पालकमंत्र्यांचे वाद असल्याने सेनेच्या कामगिरीवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येते. या पाश्र्वभूमीवर मध्यावधी निवडणुका झाल्या तर काय रणनीती असावी यासाठी विशेष बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. ४६ मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक आमदार आणि मुंबईमध्ये महापालिकेमध्ये निवडून आलेले एक नगरसेवक व स्थानिक पदाधिकारी असा चमू गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. ६ मे रोजी दौरा करून आल्यानंतर आमदारांच्या बठकीमध्ये त्यावर चर्चा होणार आहे. शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेला का पराभूत व्हावे लागले, याची कारणमीमांसा होण्याची शक्यता आहे. सेनेतील संघटनात्मक बदलासाठीही हा दौरा महत्त्वपूर्ण असेल, असे खासदार चंद्रकांत खरे म्हणाले. खासदार विनायक राऊत व खासदार खरे या दौऱ्याचे प्रमुख समन्वयक आहेत. या दौऱ्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते सहभागी होणार आहेत.
आमदारांच्या दौऱ्यानंतर प्रत्येक मतदारसंघासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वेळ देणार आहेत. त्याबरोबर शेतीच्या प्रश्नासह मराठवाडय़ातील समस्या जाणून घेण्यासाठी हे अभियान असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाडय़ातील सेनेची ताकद दिवसेंदिवस कमी होत असताना शिवसंपर्क माध्यमातून पुन्हा एका संघटनाबांधणीसाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे.



