ईव्हीएमबाबत पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली -इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्‍वासार्हतेवर अनेक विरोधी पक्षांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापार्श्‍वभूमीवर, ईव्हीएमबाबतच्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पुढील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्‍यता आहे.
देशातील विविध निवडणुकांत भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे. मात्र, ईव्हीएममधील छेडछाडीमुळेच हे शक्‍य होत असल्याचा आरोप विरोधकांनी लावून धरला आहे. ईव्हीएमच्या मुद्‌द्‌यावरून काही दिवसांपूर्वी 16 विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला. जनतेचा ईव्हीएमवरील विश्‍वास ढळला आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये पुन्हा मतपत्रिकांची पद्धत लागू करावी, अशी मागणी त्यावेळी विरोधी पक्षांकडून करण्यात आली. अर्थात, ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकत नाही, या भूमिकेवर निवडणूक आयोग ठाम आहे. असे असले तरी ईव्हीएमबाबतच्या शंका दूर करण्यासाठी आता आयोग सरसावला आहे. त्यातून 12 मे यादिवशी देशाच्या राजधानीत सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्‍यता आहे. या बैठकीसाठी 7 राष्ट्रीय पक्षांना आणि 49 प्रादेशिक पक्षांना निमंत्रण दिले जाईल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *